छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना परत घेणार का? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 21:13 IST2024-04-25T21:13:18+5:302024-04-25T21:13:29+5:30
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ परत येण्यास तयार असल्यास माफ करणार का? यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना परत घेणार का? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे, राष्ट्रवादीतील दोन्ही गट आता निवडणुकीत समोरा- समोर आले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ परत येण्यास तयार असल्यास माफ करणार का? यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर
आज खासदार शरद पवार यांनी 'टीव्ही 9 मराठी' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत खासदार पवार यांनी छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यावर भाष्य केलं. २०१९ मध्ये अजित पवार भाजपासोबत गेल्यावर तुम्ही अजित पवार यांना माफ केलं, त्यांना एक संधी दिली. पण जर छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना वाटलं चूक केली आणि ते तुमच्याकडे आले तर त्यांना माफ करणार का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, " बघूया काय होतंय ते. मला स्वत:ला वाटत नाही की जोपर्यंत मोदींच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत ते लोक त्याच रस्त्याने जाणार आहेत. कारण त्यांच भविष्य मोदींच्या हातात आहे, असंही खासदार शरद पवार म्हणाले.
मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पवारांचा हल्लाबोल
यावेळी खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. "भोपाळला पीएम मोदींनी राष्ट्रवादीवर आरोप केले. त्यांनी बँकेच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. माझ त्यांना सांगण आहे की, तुम्ही पंतप्रधान आहात तुम्ही आरोप करता. या आरोपात तथ्य असेल तर कारवाई करा आणि नसेल तर तुम्ही एका पक्षाबाबत चुकीची भूमिका मांडली याबद्दल माफी मागा, एकतर कारवाई किंवा माफी मागा, असंही खासदार शरद पवार म्हणाले.