राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? महत्त्वाची माहिती समोर आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 21:00 IST2026-02-18T20:58:30+5:302026-02-18T21:00:05+5:30
MNS Chief Raj Thackeray Meet Deputy CM Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क, चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? महत्त्वाची माहिती समोर आली
MNS Chief Raj Thackeray Meet Deputy CM Eknath Shinde: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात महायुतीविरोधात निवडणूक लढली होती. मुंबई महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवडणूक झाल्यावर वेगवेगळ्या समित्यांमधील सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क, चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजपा आणि शिंदेसेनेची महायुती अशी लढत झाली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली होती. पालिका निवडणुका आटोपल्यानंतर मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. या सर्व घडामोडींनंतर आता राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीत काय झाले, याबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' बंगल्याने एका वेगळ्या भेटीचा अनुभव घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांच्यातील कलारसिक उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अनुभवला. नंदनवन बंगल्यात लावलेली मुंबईतील हेरिटेज वास्तुंची जुनी छायाचित्रे बारकाईने न्याहळत राज ठाकरे यांनी त्यातील आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर बंगल्याचा ऐतिहासिक वारसा उत्तम कलाकृतींनी जपल्याबद्दल राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदनही केले.
दुर्मिळ आणि जुनी छायाचित्रे पाहून राज ठाकरे भारावून गेले
'नंदनवन' ही इमारत एक ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे. या इमारतीमध्ये जतन करण्यात आलेली दुर्मिळ आणि जुनी छायाचित्रे पाहून राज ठाकरे भारावून गेले. ही छायाचित्रे बारकाईने पाहताना त्या वास्तुंबद्दलची आठवण त्यांनी सांगितली. हेरिटेज इमारतींसारख्या बांधकामांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी मी मुख्यमंत्री असताना धोरण केले होते, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी राज ठाकरे यांना दिली.
दरम्यान, नंदनवन इमारतीचा हेरीटेज लूक जपतानाच परिसरात त्याचपद्धतीने बांधकाम केले असून या इमारतीच्या परिसराची देखील राज ठाकरे यांनी आवर्जून पाहणी केली. राज ठाकरे स्वतः एक उत्तम व्यंगचित्रकार आणि कलेचे चोखंदळ चाहते आहेत. राजकीय धावपळीतही या नेत्याने आपल्यातील कलाकाराला जिवंत ठेवत, ऐतिहासिक ठेव्याचे केलेले कौतुक लक्ष वेधून घेणारे ठरले.