Kishore Pednekar wins the race for the mayor of Mumbai | मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत किशोरी पेडणेकर यांची बाजी
मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत किशोरी पेडणेकर यांची बाजी

मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे पक्षांतर्गत रंगलेल्या चढाओढीत ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या नावावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले.

प्रतिष्ठेच्या या पदासाठी शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवक एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांचे नाव या शर्यतीत पुढे होते. मात्र, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रचारात आघाडीवर असलेल्या पेडणेकर यांनी बाजी मारली आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात सत्तेचे समीकरण जुळण्याची शक्यता असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने येथे आपला उमेदवार दिला नाही, तर भाजपनेही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेडणेकर यांची निवड बिनविरोध होणार आहे.

महापौर, उपमहापौरपदाचा कार्यकाळ २१ नोव्हेंबर रोजी संपत आहे. २२ नोव्हेंबर रोजी या पदांसाठी निवडणूक होणार आहे. सोडतीत मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते. त्यामुळे शिवसेनेत इच्छुक ज्येष्ठांमध्ये रस्सीखेच सुरू होती. नगरसेवकांनी मातोश्रीवर लॉबिंग सुरू केले होते. यशवंत जाधव, मंगेश सातमकर, रमाकांत रहाटे, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर यांची नावे या शर्यतीत होती. महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात शिवसेना सचिव अनिल परब यांनी बैठकीत पेडणेकर यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर, पेडणेकर यांनी संध्याकाळी सव्वापाच वाजता पालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला.

उपमहापौरपदी सुहास वाडकर
मालाड, कुरार व्हिलेज येथील नगरसेवक सुहास वाडकर यांचे नाव उपमहापौरपदासाठी जाहीर झाले आहे. २०१७ मध्ये वाडकर पहिल्यांदाच नगरसेवकपदी निवडून आले. या आधी त्यांनी विधि समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. वाडकर यांचे वडील चंद्रकांत वाडकर हेही शिवसेनेचे नगरसेवक होते.

महापौरपदी विराजमान होताच मुंबई खड्डेमुक्त व कचरामुक्त करीत स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी प्राधान्य देणार. पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवेन.
- किशोरी पेडणेकर (शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार)

सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी काम करून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवून दाखवेन.
- सुहास वाडकर (शिवसेनेचे उपमहापौरपदाचे उमेदवार)

Web Title: Kishore Pednekar wins the race for the mayor of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.