पोलीस हेल्मेटशिवाय दुचाकीवर फिरतायेत? दिसल्यास फोटो काढा, थेट कारवाई होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:42 IST2026-04-20T16:40:37+5:302026-04-20T16:42:46+5:30
विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पोलिसांनाही वाहतूक कायद्याच्या कलम १९४ डी नुसार ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

पोलीस हेल्मेटशिवाय दुचाकीवर फिरतायेत? दिसल्यास फोटो काढा, थेट कारवाई होणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पोलिसांनाही वाहतूक कायद्याच्या कलम १९४ डी नुसार ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच जाणूनबुजून वाहतूक नियम मोडल्यास संबंधितांच्या सेवा पुस्तिकेतही त्याची नोंद केली जाईल, असा इशारा अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी
दिला आहे.
दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात हेल्मेट वापरणे बंधनकारक असताना अनेकदा पोलिस, सरकारी कर्मचारीच या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले होते. याची गंभीर दखल घेत पोलिस महासंचालक कार्यालयाने आता सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. याबाबतचे परिपत्रक जारी केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
...तर फोटो काढून पाठवा; पोलिस आयुक्तालयांच्या सूचना
हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांचा फोटो काढा आणि तो शेअर करा, असेही राज्यातील काही पोलिस आयुक्तालयांकडून सांगण्यात आले आहे.
सात हजार दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू
गेल्या वर्षभरात राज्यात रस्ते अपघातात १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सुमारे सात हजार दुचाकीस्वार आहेत. दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर न केल्यामुळे मृत्यू झाल्याचे त्यात दिसून आले आहे. मुंबई आणि नागपूर वगळता राज्यातील इतर भागांत केवळ २० टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वत: आदर्श घालून देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्यांची ओळख पटवली जाणार आहे, असे सांगण्यात आले.