Consolation; Mumbai will get 500 tonnes of extra oxygen | दिलासा; मुंबईला मिळणार पाचशे टन अतिरिक्त ऑक्सिजन

दिलासा; मुंबईला मिळणार पाचशे टन अतिरिक्त ऑक्सिजन

 


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी रुग्णालयांसह महापालिका रुग्णालयांनाही ऑक्सिजनच्या तुटवड्याची झळ बसत आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांना उपलब्ध ऑक्सिजन साठ्याचा काटकसरीने वापर करण्याची सक्त ताकीद पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत मुंबईसाठी सध्या दररोज मिळणारा २३५ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा कमी होणार नाही, याची खातरजमाही सोमवारी करण्यात आली. तसेच सर्व रुग्णालय, कोविड केंद्रांमध्ये ऑक्सिजनच्या वितरणावर यापुढे विशेष पथकाचे लक्ष असेल. दरम्यान, विशाखापट्टणम, जामनगर, रायगड येथून एकूण पाचशे टन ऑक्सिजन लवकरच मिळणार आहे.
पालिकेच्या सहा रुग्णालयांमध्ये शुक्रवारी ऑक्सिजनचा तुटवडा निर्मण झाल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पालिका प्रशासन, अधिकारी व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून १६८ रुग्णांना रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत अन्य रुग्णालय व कोविड केंद्रांत हलविले. सुदैवाने या मोहिमेत कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. मात्र, या मोहिमेनंतर मुंबईत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महापालिकेने मिशन मोड जाहीर केले आहे. त्यानुसार आयुक्तांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावली होती. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे पालिका अधिकारी, अधिष्ठाता, ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादार या बैठकीत सहभागी झाले होते.
दररोज २३५ मेट्रिक टन पुरवठा
ऑक्सिजनची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने अन्न व औषध प्रशासनासह ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादार यांच्यावर ताण वाढला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईसाठी सध्या प्रतिदिन देण्यात येत असलेला २३५ मेट्रिक टन प्राणवायू साठा कमी करण्यात येऊ नये. ऑक्सिजन उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व कोरोना रुग्णालये, केंद्र व इतर रुग्णालयांत त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी पथके नेमण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

ऑक्सिजन वितरणावर गुगल ड्राइव्हद्वारे लक्ष
मिशन माेडअंतर्गत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहाण्यासाठी, दैनंदिन प्राणवायू वितरण प्रणालीत अचूकता राखण्यासाठी गुगल ड्राइव्हच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल. याबाबत पालिका प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त चहल यांनी दिले. यामुळे किती ऑक्सिजन मुंबईतील रुग्णालयांत उपलब्ध होतो, त्यावर देखरेख ठेवता ये­ईल. या मोहिमेला सहकार्य करण्याची तयारी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दाखवली. या बैठकीत ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांच्या समस्या, मागण्या जाणून घेण्यात आल्या.

प्राणवायूअभावी अनुचित प्रसंग ओढवणार नाही, याची दक्षता घ्या!
विशाखापट्टणम, जामनगर, रायगड येथून मिळून सुमारे ५०० टन अधिकचा ऑक्सिजन साठा लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दिलासा मिळेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा, ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांनी ‘मिशन मोड’वर काम करावे, समन्वय अधिकाऱ्यांसह मिळून सर्व विभागातील रुग्णालयांना वेळेवर ऑक्सिजन साठा पुरवावा. प्राणवायूच्या कमतरतेमुळे अनुचित प्रसंग ओढवणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालिका आयुक्त 
इक्बाल सिंह चहल यांनी दिले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Consolation; Mumbai will get 500 tonnes of extra oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.