मोबाइल यूटीएस साहाय्यकांमुळे मध्य रेल्वेला ७ कोटींचा महसूल; सहा महिन्यांत ५.४० लाख प्रवाशांनी घेतला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:57 IST2026-05-07T11:56:59+5:302026-05-07T11:57:38+5:30
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मोबाइल यूटीएस सहाय्यक या सुविधेची सुरुवात केली.

मोबाइल यूटीएस साहाय्यकांमुळे मध्य रेल्वेला ७ कोटींचा महसूल; सहा महिन्यांत ५.४० लाख प्रवाशांनी घेतला लाभ
मुंबई : मध्य रेल्वेने तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सुरू केलेल्या मोबाइल यूटीएस साहाय्यक उपक्रमाला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून अवघ्या सहा महिन्यांत ५.४० लाख प्रवाशांना याचा लाभ झाला असून, या कालावधीत ३.८६ लाख तिकिटे जारी केली आहेत. तर तिकीट विक्रीच्या माध्यमातून रेल्वेला तब्बल ६.८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मोबाइल यूटीएस सहाय्यक या सुविधेची सुरुवात केली.
तिकीटविरहित प्रवासाला आळा
या उपक्रमामुळे तिकीट खिडक्यांवरील लांब रांगा कमी होण्यास मदत झाली असून, तिकीटविरहित प्रवासालाही आळा बसत आहे.
जागेवरच तिकीट उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचत असून, प्रवास अधिक सोयीस्कर झाला असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
सुरुवातीला ३ सहाय्यक तैनात करण्यात आले होते. त्यानंतर आणखी ५ साहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली.
महिन्याभरात उत्पन्न वाढले
प्रवाशांची वाढती गर्दी आणि सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन जानेवारी २०२६ मध्ये आणखी
५ सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे सध्या एकूण ८ मोबाइल यूटीएस सहाय्यक कार्यरत आहेत.
हे साहाय्यक प्रवाशांपर्यंत थेट जाऊन तिकिटे देतात. त्यांच्याकडे मोबाईल फोन आणि पोर्टेबल तिकीट प्रिंटिंग मशीन असून, कॉनकोर्स, होल्डिंग एरिया किंवा रेल्वे परिसरातच तिकीट सेवा उपलब्ध करून दिली जाते.
प्रवाशांना रोख तसेच डिजिटल पेमेंटचा पर्यायही देण्यात आला आहे. एप्रिल २०२६ या एका महिन्यातच १.७२ लाख प्रवाशांसाठी १.२५ लाख तिकिटे जारी करण्यात आली असून, २.२२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.