मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 05:39 PM2024-03-10T17:39:54+5:302024-03-10T17:43:10+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी आज रात्री ८ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते.

Big news Sanjay Nirupam preparing to take a big political decision likely to join Shiv Sena today | मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा

मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा

Congress Sanjay Nirupam ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून पुन्हा एकदा नेत्यांच्या पक्षांतराला वेग आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर हे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी आज रात्री ८ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. याच पक्षप्रवेश सोहळ्यावेळी काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र मी शिवसेनेत प्रवेश करणार, ही अफवा असल्याचं निरुपम यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर नाराज झालेल्या निरुपम यांनी आज सकाळी सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी जाहीर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचं तिकीट मिळावं, यासाठी संजय निरुपम यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात होतं. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मी प्रवेश करणार ही अफवा असून मी आता मालाड पूर्व येथे क्रिकेट स्पर्धेत आहे, असा खुलासा निरुपम यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना संजय निरुपम काय म्हणाले?

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी उमेदवाराची घोषणा केल्याने संतप्त झालेल्या संजय निरुपम यांनी आज आपल्या एक्स हँडलवर खरमरीत पोस्ट लिहीत ठाकरेंवर निशाणा साधला. " काल संध्याकाळी उरलेल्या शिवसेना पक्षाच्या प्रमुखांनी अंधेरी येथील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित केला. हे कसं होऊ शकतं? महाविकास आघाडीच्या दोन डझन बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. ही जागाही प्रलंबित असलेल्या ८-९ जागांपैकी एक आहे, असं मला जागा वाटप बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. मग शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणं हे आघाडी धर्माचं उल्लंघन नाही का? काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने यामध्ये हस्तक्षेप करावा," अशी मागणी संजय निरुपम यांच्याकडून करण्यात आली होती.

 

Web Title: Big news Sanjay Nirupam preparing to take a big political decision likely to join Shiv Sena today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.