सावधान ... मुंबईत ४८ ब्लॅकस्पॉट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:08 IST2026-05-19T10:08:38+5:302026-05-19T10:08:49+5:30
पालिका २२ कोटी खर्चून अपघातप्रवण क्षेत्रांचा कायापालट करणार; निविदा प्रक्रिया लवकरच

सावधान ... मुंबईत ४८ ब्लॅकस्पॉट !
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहरात तब्बल ४८ ब्लॅकस्पॉट म्हणजेच अपघातप्रवण क्षेत्रांची नोंद पालिकेकडून करण्यात आली असून, या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, असमतल पृष्ठभाग, अपुरी पादचारी सुविधा आणि वेगवान वाहतूक यामुळे वारंवार गंभीर अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. या क्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी पालिका लवकरच निविदा काढून कंत्राटदाराची नियुक्ती करणार असून, २२ कोटी खर्च करणार आहे. मुंबईतील वाढत्या वाहनांना सामावून घेत वेगवान वाहतुकीसाठी नवनवे रस्ते, उड्डाणपूल उभारले जात असले तरी अपघातांची समस्या गंभीर होत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषांनुसार, तीन वर्षांच्या कालावधीत पाच गंभीर अपघात किंवा दहापेक्षा अधिक मृत्यू झालेल्या ५०० मीटरच्या रस्त्याच्या पट्ट्याला ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित केले जाते. जवळपास तीन वर्षांपूर्वी मुंबईतील अपघातांसाठी २० धोकादायक, अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) कारणीभूत ठरत असल्याचे दोन वर्षांपूर्वी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या क्षेत्रांचा ‘कायापालट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व क्षेत्रांच्या रचनेमध्ये बदल करण्याचे निश्चित केले.
मागील दोन वर्षांत या उपाययोजना कागदावरच
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा, वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी गतिरोधक व पट्ट्या इत्यादी उपायोजना याअंतर्गत केल्या जाणार होत्या. मात्र, मागील दोन वर्षांत या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत.
त्यामुळे आता अपघातप्रवण क्षेत्रांची संख्या ४८ वर पोहोचली असल्याने आता पालिकेकडून आता या ब्लॅकस्पॉटवर दुरुस्त्या आणि करून ते सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शहरातील ब्लॅकस्पॉट कोणते ?
या ४८ ठिकाणांमध्ये शहरातील अतिवर्दळीचे आणि संवेदनशील चौकांचा समावेश आहे. त्यामध्ये अमर महाल जंक्शन, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड यांचे क्रॉसिंग, सायन सर्कल जंक्शन, किंग्ज सर्कल जंक्शन, साकीनाका जंक्शन, हाजी अली जंक्शन, मिठ चौकी (मालाड), बिंदूमाधव ठाकरे जंक्शन (वरळी), माहीम जंक्शन आणि चेंबूरमधील छेडानगर जंक्शन यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
पादचाऱ्यांसाठीही विशेष उपाययोजना राबविणार
या प्रकल्पांतर्गत या सर्व ठिकाणी पादचारी मार्ग आणि झेब्रा क्रॉसिंग रुंद करण्यात येणार आहेत. तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रंबल स्ट्रिप्स, स्पीड ब्रेकर आणि इतर वाहतूक नियंत्रण उपाययोजनाही राबवण्यात येणार आहेत.
या बदलांमुळे वाहन आणि पादचारी यांच्यातील संघर्ष कमी होईल, वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होईल आणि शहरातील रस्ते अधिक सुरक्षित बनतील, असे मत महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
विशेषतः सायन आणि किंग्ज सर्कल जंक्शन येथेही मजबूत काँक्रीट मिश्रण वापरून रस्त्यांचे पुनर्बांधणी काम करण्यात येणार आहे.
या भागांमध्ये वारंवार होणारे अपघात, मृत्यू आणि गंभीर जखमींची संख्या लक्षात घेऊन सुधारणा तातडीने करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.