आंबा, काजू उत्पादकांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत; CM फडणवीसांची घोषणा, कोकणवासीयांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 07:29 IST2026-03-26T07:27:05+5:302026-03-26T07:29:23+5:30
मुख्यमंत्री म्हणाले, वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजूला कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे.

आंबा, काजू उत्पादकांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत; CM फडणवीसांची घोषणा, कोकणवासीयांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. फळपीक उत्पादकांनी विमा काढला आहे त्यांना जास्त मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजूला कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे. क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा अहवाल मागवला असून सकृतदर्शनी फळबागांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात १ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. तर काजू पिकाखाली १ लाख ७५ हजार १४० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मागील वेळी आपण आंबा आणि काजू उत्पादकांना १५ हजार हेक्टरी मदत दिली होती, यावेळी ती हेक्टरी २२ हजार रुपये केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अंतिम आठवडा प्रस्तावासह अन्य प्रस्तावांवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंबा आणि काजूसह धान उत्पादकांनाही बोनस देण्यात येईल त्यासंबंधीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येत असल्याचे सांगितले.