रेल्वे वसाहतीत अंगणवाडी

By Admin | Updated: January 9, 2015 00:28 IST2015-01-09T00:28:55+5:302015-01-09T00:28:55+5:30

घाटकोपर (पूर्व) येथील लोहमार्ग पोलीस वसाहतीत राहणाऱ्या बच्चेकंपनीसाठी आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी ‘चिमणी-पाखरे’ अंगणवाडी आणि ‘निसर्ग व्यायामशाळा’चा शुभारंभ पार पडला.

Anganwadi in the railway colony | रेल्वे वसाहतीत अंगणवाडी

रेल्वे वसाहतीत अंगणवाडी

घाटकोपर : घाटकोपर (पूर्व) येथील लोहमार्ग पोलीस वसाहतीत राहणाऱ्या बच्चेकंपनीसाठी आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी ‘चिमणी-पाखरे’ अंगणवाडी आणि ‘निसर्ग व्यायामशाळा’चा शुभारंभ पार पडला.
या वसाहतीतील पोलिसांच्या मुलांची शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या अंगणवाडीचा मोठा उपयोग होणार आहे. राज्याचे गृहनिर्माण, खाण आणि कामगारमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते याचा उद्घाटन सोहळा पार पडला. दरम्यान, मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, लोहमार्ग पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे, एकात्मिक बालविकास योजना महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त विनिता सिंघलसह अनेक मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित होते. या उद्घाटनावेळी बोलताना लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल म्हणाले की, या अंगणवाडी आणि निसर्ग व्यायामशाळेमुळे पोलिसांच्या परिवारांना मोठा फायदा होणार आहे. अशाच प्रकारे जर या पोलीस वसाहतीच्या लोकसंख्येच्या मानाने आणखी एक अंगणवाडी, एक व्यायामशाळा आणि एक अद्ययावत ग्रंथालय बनविल्यास फार मोठा फायदा होईल. जे युवक स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांना या ग्रंथालयाचा फार मोठा फायदा होणार असल्याने सरकारकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत.
त्याचबरोबर एकात्मिक बालविकास विभागातर्फे लहान मुलांबरोबरच गरोदर माता, किशोरवयीन मुलींसाठी वेगवेगळे हेल्थ कॅम्प, स्वयंरोजगाराबद्दल माहिती तसेच पाककृतीबद्दलचे वर्ग या संदर्भातही कार्य करण्यात येणार आहे. तसेच या अंगणवाडीत लहान मुलांसाठी पोषक आहार, वेगवेगळे खेळाचे साहित्य देण्यात येणार आहे.
निसर्ग व्यायामशाळेमुळे खुल्या हवेत पोलीस अधिकाऱ्यांना व्यायाम करण्याचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाला येथील हजारो रेल्वे पोलीस वसाहतीतील पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि त्यांचे परिवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Anganwadi in the railway colony