'त्या' सगळ्या अफवा, जिथं महायुतीत लढलो तिथं...; महापौरपदाबाबत एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:31 IST2026-01-19T16:28:37+5:302026-01-19T16:31:01+5:30
ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजपा हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असं शिंदेंनी स्पष्ट सांगितले.

'त्या' सगळ्या अफवा, जिथं महायुतीत लढलो तिथं...; महापौरपदाबाबत एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका
मुंबई - शिवसेना आणि भाजपा हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईमध्ये महानगर निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना-भाजपाला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं शिंदेंनी सांगितले.
त्याशिवाय ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजपा हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे भाजपाचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शाह त्यांना खांद्यावर घेऊन फिरतात पण शिंदेंची चावी नक्की कोणाकडे आहे? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारत भाजपातील अंतर्गत गटबाजीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. मुंबई महानगपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी होणारी संभाव्य फोडाफोड टाळण्यासाठी शिंदेसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.