मार्कर पेन ते अमिट शाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 13:37 IST2026-01-25T13:36:09+5:302026-01-25T13:37:32+5:30
Indelible Ink: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने मतदारांच्या बोटावर मतदानाची खूण म्हणून शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला. यानंतर काही मतदारांनी ही शाई विविध रसायने वापरून पुसून दाखवली. त्यामुळे मार्कर पेनच्या शाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

मार्कर पेन ते अमिट शाई
-सुजित महामुलकर
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने मतदारांच्या बोटावर मतदानाची खूण म्हणून शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला. यानंतर काही मतदारांनी ही शाई विविध रसायने वापरून पुसून दाखवली. त्यामुळे मार्कर पेनच्या शाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मोठा गदारोळ झाला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मार्कर पेनऐवजी बाटलीतील शाई वापरण्याचा निर्णय घेतला.
१. 'इंडेलिबल इंक' म्हणजे काय?
बोगस मतदान रोखणे आणि एका व्यक्तीला एकाच वेळी मतदान करता यावे हे सुनिश्चित करण्यासाठी मतदान करताना मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावली जाणारी, सहज न मिटणारी आणि १०-१५ दिवस कायम राहणारी शाई म्हणजे ‘इंडेलिबल इंक’ होय.
डाव्या हाताच्या तर्जनीवरच शाई का?
- उजव्या हाताचा जेवणासाठी जास्त वापर होतो.
- शाईतील रसायनांचा आरोग्यावर परिणाम टाळण्यासाठी.
- मार्कर पेन विरुद्ध बाटलीतील शाई
- १.५ लाख मार्कर पेन महापालिका निवडणुकीत वापरले गेले.|
- ६०-७०,००० शाईच्या बाटल्यांची ऑर्डर राज्य आयोगाने जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी दिली आहे.
-३००-४०० बोटांवर ५ मि.लि.च्या एका बाटलीतून खूण केली जाऊ शकते.
खर्च कोण करतो?
राज्य निवडणूक आयोग. राज्य शासनाकडून अनुदान मिळते.
२. कशी झाली निर्मिती?
प्रथम वापर : भारतीय निवडणूक आयोगाने १९६२ च्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपासून या शाईचा वापर सुरू केला.
संशोधन : ही शाई ‘नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया’ने (एनपीएल) विकसित केली आहे.
३. कोण करते उत्पादन?
कंपनीचे नाव : म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल).
मालकी : ही कर्नाटक सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.
४. शाई कशी काम करते?
मुख्य घटक : सिल्व्हर नायट्रेट (१० ते १८ टक्के), जांभळा रंग.
काय होते? : त्वचेवरील प्रथिनांशी संपर्क आल्यावर ही शाई ‘सिल्व्हर क्लोराईड’ तयार करते, जे पाण्यात विरघळत नाही. ४० सेकंदांत शाई सुकते, पाण्याचा संपर्कात रंग काळसर होतो.
टिकाऊपणा : एकदा लावल्यानंतर ही शाई किमान १५ दिवस ते काही आठवडे टिकते.
प्रकाशाचा प्रभाव : सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर शाईची खूण अधिक गडद होते.
मिटते का? : कोणत्याही साबणाने, डिटर्जंटने किंवा केमिकलने ही शाई लगेच पुसता येत नाही.