मालेगाव मनपा निवडणूक; आजपासून प्रचाराचे धुमशान, १२ दिवसांचा मिळणार कालावधी : उमेदवारांची होणार धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:10 IST2026-01-03T14:10:21+5:302026-01-03T14:10:54+5:30
प्रचारासाठी अवघा १२ दिवसांचा कालावधी मिळत असल्यामुळे या काळात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत सर्व उमेदवारांना करावी लागणार आहे.

मालेगाव मनपा निवडणूक; आजपासून प्रचाराचे धुमशान, १२ दिवसांचा मिळणार कालावधी : उमेदवारांची होणार धावपळ
मालेगाव : येथील महापालिकेच्या निवडणुकीमध्ये माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवार, दि. ३ पासून प्रचाराची धामधूम सुरू होणार आहे. प्रचारासाठी अवघा १२ दिवसांचा कालावधी मिळत असल्यामुळे या काळात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत सर्व उमेदवारांना करावी लागणार आहे. अपक्ष उमेदवारांना चिन्हवाटपासाठी आणखी एक दिवस वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना आणखी कमी कालावधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
निवडणुकीत शनिवारी (दि. ३) उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून, चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. मात्र, या प्रक्रियेनंतर अपक्ष उमेदवारांच्या हाती खूपच कमी कालावधी राहणार असल्यामुळे सर्वच उमेदवारांपुढे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान असणार आहे. चारसदस्यीय प्रभागपद्धतीमुळे प्रभागांची व्याप्ती मोठी असून, काही प्रभागांमध्ये मतदारांची संख्या १८ ते २० हजारांपर्यंत आहे. एका दिवसात किमान एक हजार मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधायचा म्हटले, तरी हा कालावधी अपुरा पडणार आहे. सकाळी सात ते रात्री १० वाजेपर्यंत 'नॉनस्टॉप' प्रचार, रॅली आणि बैठका घेतल्या तरी प्रत्येक घर गाठणे उमेदवारांना कठीण होणार आहे.
प्रभाग - २१
मैदानातील उमेदवारांची संख्या - ३०१
निवडून द्यावयाचे नगरसेवक - ८३
बिनविरोध निवड - ०१
सोशल मीडियावर प्रचार वाढला
पारंपरिक डोअर-टू-डोअर प्रचारासोबतच कॉर्नर सभा, छोट्या रॅली, पदयात्रा आणि सोशल मीडियाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. विशेषतः तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, आदी माध्यमांवर प्रचार वाढवण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष भेटीअभावी मतदारांच्या मनात ठसा उमटवायचा कसा? हा प्रश्न नवीन उमेदवारांना भेडसावत आहे. एकूणच, कमी वेळ, मोठे प्रभाग आणि मतदारांची मोठी संख्या यांमुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रचार हा उमेदवारांसाठी सर्वांत मोठा कसोटीचा विषय ठरणार आहे. माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर मालेगावच्या राजकारणात खऱ्या अर्थाने प्रचारयुद्धाला सुरुवात झाली आहे.