८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:43 IST2026-01-02T16:42:09+5:302026-01-02T16:43:01+5:30
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने दिली होती.

८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
मालेगाव नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी ही व्यवस्था असणार नाही. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतही तशी संधी संबंधित मतदारांना नव्हती. त्यामुळे वयोवृद्ध मतदार आणि त्यांचे नातेवाईक नाराज आहेत.
८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेणे खूपच अडचणीचे असते. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांचे मतदान करून घेण्यासाठी निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेतले. आता महापालिका निवडणुकीत ही मुभा दिलेली नाही. त्यामुळे १५ जानेवारीला मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना जावे लागणार आहे. ज्येष्ठांना घरी बसून मतदान करण्याची सुविधा मनपाच्या निवडणुकीसाठी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी नियमावली, सूचना आणि मार्गदर्शन करणारी पुस्तिका दिली आहे. त्यामध्ये ८५ वर्षांवरील मतदारांना घरून मतदान करण्याची कोणतीही सुविधा दिलेली नाही. त्यामुळे मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे लागेल. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
केंद्रापर्यंत जाणे शक्य नसलेल्या ज्येष्ठ मतदारांचे मतदान करून घेण्याचा प्रश्न
मतदान हा आमचा हक्क आहे, मात्र शारीरिक मर्यादा लक्षात न घेता निर्णय घेण्यात आला, अशी भावना ज्येष्ठ मतदारांनी व्यक्त केली. विशेषतः एकटे राहणारे, आजारपणाने त्रस्त किंवा हालचालींवर मर्यादा असलेले नागरिक यांना मतदान केंद्रापर्यंत नेणे कुटुंबीयांसाठीही मोठे आव्हान ठरणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि सर्वसमावेशक लोकशाही प्रक्रियेसाठी ही सुविधा आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
प्रशासनाच्या वतीने मात्र मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
रॅम्प, व्हीलचेअर, स्वयंसेवकांची मदत, प्राधान्य रांग तसेच मदत कक्ष उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट २ करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरेल, याबाबत ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या नातेवाइकांमधून साशंकता व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत घरून मतदानाची सुविधा न 3 दिल्यास मतदानाचा एकूण टक्का घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र राजकीय पक्षाचे नेते या मतदारांना केंद्रापर्यंत घेऊन येण्याचा दिलासा देखील आहे.