Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:33 IST2026-01-01T15:31:38+5:302026-01-01T15:33:03+5:30
Malegaon Municipal Election Result 2026: अर्ज छाननीत वेळी शाहिना बानो यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
Malegaon Ward No 6 Winner: मालेगाव उमेदवारी अर्ज छाननीत महापालिकेच्या प्रभाग ६ मधील एका अपक्ष महिला उमेदवाराने नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने या प्रभागातील इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मुहम्मद यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून इस्लाम पार्टीने खाते उघडले आहे.
मनपाच्या प्रभाग ६ मधील शाहिना बानो सलीम खान यांनी 'ब' वर्गात एमआयएमतर्फे तर 'क' वर्गात अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते तर इस्लाम पार्टीतर्फे मुनिरा शेख यांनी 'क' जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
अर्ज छाननीत वेळी शाहिना बानो यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या प्रभागातील 'क' जागेवर फक्त मुनीरा शेख यांच्या रूपाने एकमेव उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिल्याने त्यांच्या बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला, त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा माघारीनंतर होणार आहे. त्यांचा विजय निश्चित झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
नियमानुसार एका प्रभागात एकाच जागेवर उमेदवारी
नियमानुसार एका उमेदवाराला एका प्रभागात एकाच जागेवर उमेदवारी करता येते. त्यामुळे अर्ज छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजुळ यांनी शाहिना बानो यांना कोणताही एकच अर्ज ठेवण्यास सांगितले. त्यावर शाहीना बानो यांनी या प्रभागातील ब जागेवरील आपला एमआयएम पक्षाचा उमेदवारी अर्जाची छाननी करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचा अपक्ष जागेवरील अर्ज बाद ठरला.
मुनिरा यांचे पती नगरसेवक
बिनविरोध निवडून आलेल्या मुनिरा शेख यांचे पती फकीर मोहम्मद शेख सादिक हे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार पै. रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे तत्कालीन प्रभाग ५ मध्ये उमेदवारी केली होती. त्यावेळी ते ६ हजार २१० मतांनी निवडणून आले होते. या प्रभागात १९८३ पासून शेख कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे.
आसिफ शेख झाले होते बिनविरोध
मनपाच्या स्थापनेपासून ही पाचवी पंचवार्षिक निवडणूक असून माजी आमदार आसिफ शेख हे २००२ च्या पहिला महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये प्रभाग १९ व्या किशवरी अशरफ कुरेशी या 'क' जागेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. आता शेख मुनिरा या तिसऱ्या बिनविरोध नगरसेविका ठरल्या आहेत.