नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:41 IST2025-12-30T13:40:26+5:302025-12-30T13:41:43+5:30
Malegaon Municipal Corporation Election 2026 : उद्धवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) नेही बाळगली सावधगिरी

नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
मालेगाव: सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, एका जागेसाठी अनेकांनी दावा केल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे. विशेषतः भाजप-शिंदेसेनेकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने या दोन्ही पक्षांनी उमेदवारीबाबत अखेरपर्यंत सस्पेन्स राखला आहे. असे असले तरी या पक्षांनी काही इच्छुकांना अर्ज भरून कामाला लागण्याचे आदेश देखील दिले आहेत. उमेदवारीसाठीची दावेदारी पाहाता इच्छुकांना एबी फॉर्मचे वाटप अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि. ३०) केले जाणार आहे मात्र दगाफटका टाळण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीच अनेकांच्या हाती एबी फॉर्म पडण्याची शक्यता देखील आहे. उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून देखील उमेदवारी निश्चितीबाबत सावधगिरी बाळगण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे आणि पुणे या ठिकाणी महापालिकांमध्ये महायुतीचा निर्णय झाला आणि अधिकृतरित्या एबी फॉर्मचे वाटप देखील करण्यात आले. परंतु, मालेगावबाबत महायुतीकडून कोणतीही स्पष्टता अखेरपर्यंत आलेली नव्हती. आपल्या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने युती होण्याची शक्यता धुसर झाली होतीच. आता एबी अर्जाबाबतही सस्पेन्स ठेवण्यात आल्याने युती, आघाडी न होता येथे सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, ऐनवेळी सेना-राष्ट्रवादी असे समीकरण जुळविण्याचे प्रयत्न असतील, अशा हालचाली होत असल्याचीही चर्चा आहे.
मालेगाव महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी नामनिर्देशन भरण्याची मंगळवारी (दि. ३०) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असून अद्याप एमआयएम वगळता इतर पक्षांनी एबी फॉर्म दिलेले नाहीत. त्यामुळे एबी फॉर्म वाटपासाठी मंगळवारी (दि. ३०) दुपारचा मुहूर्त काढण्यात आला आहे. त्यामुळे कुणाला तिकीट मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयात इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी दिवसभर मोठी गर्दी झाली होती.
समाजवादीचे उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याचे आदेश
समाजवादी पक्षाने इस्लाम पार्टीशी केलेल्या चर्चेनंतर दोन ते तीन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने अंतिम उमेदवार निश्चिती झालेली नाही. त्यामुळे पक्षाचे एबी फॉर्म वितरीत करण्यात आलेले नाही. असे असले, तरी समाजवादी पक्षाने उर्वरीत प्रभागांतील उमेदवारांना आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले असून, पक्षाच्या निश्चित उमेदवारांना मंगळवारी एकत्रित एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती मुस्तकीन डिग्नीटी यांनी दिली आहे.
मालेगाव सेक्युलर फ्रंटचे काही उमेदवार प्रलंबित
समाजावादी पार्टी व इस्लाम पार्टी यांच्या जोडीला वंचित बहुजन आघाडी येऊन मिळाल्याने तिघांची युती झाली आहे. त्यामुळे त्यांच्यातील जागा वाटपाचे गणित काही अंशी डळमळीत झाले आहे. यातील इस्लाम पार्टीने २७ पेक्षा उमेदवार तर मुस्तकीन डिग्नीटी यांच्या समाजवादीने २० पेक्षा जास्त उमेदवार घोषित केले असून उर्वरीत उमेदवार मंगळवार सकाळपर्यंत निश्चित करण्यात येणार आहे.
त्यामुळे इस्लाम पार्टीने निश्चित केलेल्या प्रभागातील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सांगितले असून, मंगळवारी दुपारी ते आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात असल्याची माहिती माजी आमदार आसिफ शेख यांनी दिली आहे.
ठाकरे बंधू एकत्र मात्र मालेगावात दोघांचे ठरेना
दोन्ही ठाकरे बंधू मालेगावातील किती जागा लढवतील, याबाबतही अजूनही संभ्रमावस्था आहे. दोघे एकत्रित निवडणूक लढविणार असल्याने मालेगावात त्यांचे किती उमेदवार असतील याकडे सर्वांचे लक्ष असेल.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. उद्धवसेनेचे काही उमेदवार निश्चित झाले असले तरी त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. सेनेतर्फे मनपाच्या प्रभाग ९ मध्ये चारही जागा लढविण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे कैलास तिसगे यांनी दिली. त्यातच त्यांच्या उमेदवारांचे नावे निश्चिती नसल्याने ते ऐनवेळी ते आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देणार आहेत.
एमआयएमचे ५० उमेदवारांना एबी फॉर्म वितरण
मालेगावमध्यचे आमदार मुफ्ती महंमद इस्माईल यानी पूर्व भागातील ६४ पैकी ५० उमेदवार निश्चित केले आहेत. त्यांना सोमवारपासून (दि. २९) पक्षाचे एबी फॉर्म वाटपास सुरुवात केली आहे. त्यामुळे नामनिर्देशनपत्राबरोबर एबी फॉर्म देणारा शहरातील पहिला पक्ष ठरला आहे. दुसरीकडे त्यांना शहराच्या पश्चिम भागात अद्याप एकही मजबूत उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पश्चिम भागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची शक्यता धूसर झाली आहे. मंगळवारी आणखी कुणाला एबी फॉर्म मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
काँग्रेसचे २७ उमेदवार निश्चित
काँग्रेस महाविकास आघाडीतून लढणार असले तरी त्यांच्यात अद्याप जागा वाटप झालेले नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने शहराध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचे निश्चित केले असून, त्यांनी आपल्या उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या असून, २४ उमेदवार निश्चित केले आहेत. त्यांना अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने शेवटच्या दिवशी पक्षातर्फे एबी फॉर्म देण्यात येणार आहे.
मागील निवडणुकीत २८ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील काँग्रेस जास्तीत जास्त उमेदवार निवडणुकीत उतरविण्याच्या तयारीत आहे. मंगळवारचा दिवस सर्वच पक्षांसाठी महत्वाचा असल्याने या दिवशी घडणाऱ्या घडामोठी महत्त्वतपूर्ण ठरणार आहे. मतविभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येणार का? याबाबतचा सस्पेन्स देखील कायम आहे.