मालेगाव पालिकेला 'लक्ष्मीदर्शन'; पंधरा दिवसांत १ कोटी ८३ लाखांची भर : उमेदवारी अर्ज विक्रीतूनही मिळाले साडेतीन लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:53 IST2026-01-10T12:53:13+5:302026-01-10T12:53:47+5:30
Malegaon Municipal Corporation Election 2026: निवडणुकीच्या काळात मालेगाव महापालिकेला कोट्यवधींचे लक्ष्मीदर्शन घडले.

मालेगाव पालिकेला 'लक्ष्मीदर्शन'; पंधरा दिवसांत १ कोटी ८३ लाखांची भर : उमेदवारी अर्ज विक्रीतूनही मिळाले साडेतीन लाख
मालेगाव : निवडणुकीच्या काळात मालेगाव महापालिकेला कोट्यवधींचे लक्ष्मीदर्शन घडले. उमेदवार आणि त्यांच्या सुचक, अनुमोदकांनी करांचा भरणा केल्यामुळे पालिकेला कराच्या माध्यमातून एकूण १ कोटी ८३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे तर उमेदवारी अर्ज विक्रीतून ३ लाख ५५ हजार रुपयांची कमाई झाल्याने मनपाच्या तिजोरीत भर पडली आहे.
येथील महापालिकेच्या ८४ जागा असून त्या जागांसाठी ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काळात १ हजार ७५५ जणांनी अर्ज खरेदी केली आहे. त्यापोटी मनपाला ३ लाख ५५ हजार रुपये मिळाले आहेत. यातील ८०० जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यात अर्ज पडताळणीत ७०० च्या आसपास अर्ज वैध ठरले होते. त्यातील अनेकांनी माघार घेतली असून ३०१ जण उमेदवारी करत आहेत. त्यांची अनामत रकमेचा आकडा मोठा आहे.
मनपाची विविध करांच्या माध्यमातून ४७ कोटींची थकबाकी येणे बाकी आहे. त्यांनी ३५ ते ४० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यातील त्यांनी १२ ते १५ कोटींची वसुली केल्याची माहिती आहे.
४७ कोटींची थकबाकी
१५ कोटी रुपयांपर्यंत झाली वसुली
२० ते २२ कोटींची थकबाकी
१. मनपाची आजही घरपट्टी व नळपट्टीपोटी २० ते २२ कोटींची थकबाकी असून त्यात घरपट्टी व पाणी पट्टीचा समावेश आहे.
२. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार थकबाकीदार नसल्याची अट मनपाच्या चांगल्याच पथ्यावर पडली आहे.
३. त्यामुळे कधी नव्हे ते अनेक थकबाकीदारांनी आपली थकबाकी भरल्याने मनपाला ही निवडणूक चांगलीच पथ्यावर पडली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मनपाचे नादे प्रमाणपत्र
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना मनपाची कोणतीही थकबाकी नसल्याचे (नादे) प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे ७०० ते ८०० इच्छुकांनी नादे प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज केले होते. त्यापोटी मनपाला हजारो रुपयांची कमाई झाली आहे. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे.