Corporator Salary: नगरसेवकांना किती मानधन अन् भत्ते मिळतात? नगरसेवकांचे मानधन नक्की ठरते तरी कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:33 IST2026-01-13T16:32:54+5:302026-01-13T16:33:24+5:30
Corporator Salary: महापालिकेतील नगरसेवकांना वेतन दिले जात नाही तर मानधन दिले जाते.

Corporator Salary: नगरसेवकांना किती मानधन अन् भत्ते मिळतात? नगरसेवकांचे मानधन नक्की ठरते तरी कसे?
नाशिक : नगरसेवकांना मिळणारे मानधन, भत्ते आणि सुविधा महानगरपालिका क्षेत्रानुसार बदलतात, पण त्यांना मासिक मानधनासोबत बैठक भत्ता, प्रवास भत्ता, टेलिफोन आणि स्टेशनरी खर्च मिळतो; तसेच, मालेगाव हे ड वर्ग महापालिकेत मोडत असल्याने येथील नगरसेवकांना दहा हजार रुपये इतके मानधन मिळते.
लोकप्रतिनिधींना वेतन नव्हे मानधन
महापालिकेतील नगरसेवकांना वेतन दिले जात नाही तर मानधन दिले जाते. महापालिकेची अ, ब, क, ड अशी वर्गवारी असते. त्यानुसार मानधन ठरते.
महापालिका श्रेणीनुसार ठरते रक्कम
'अ' वर्गातील मोठ्या शहरांच्या नगरसेवकांना जास्त मानधन मिळते, तर 'क' किंवा 'ड' वर्गातील लहान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींना कमी मानधन मिळते.
वॉर्ड विकास निधी कुणाला किती?
महापालिकेतील वॉर्ड विकास निधी प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी दिला जातो, पण प्रत्येकाला 'किती' निधी मिळतो, महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पानुसार निधीची तरतूद केली जाते. प्रभागातील समस्या निराकरणासाठी नगरसेवकाला निधी दिला जातो.
बैठक भत्ता, प्रवास भत्ता व इतर सुविधा
बैठकांसाठी ४०० रुपये भत्ता मिळतो तसेच प्रवासासाठी भत्ता आणि मोबाइल भत्ता, वैद्यकीय सुविधा, अशा सुविधा मिळतात. महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या धोरणानुसार त्या बदलतात.
विविध समित्यांवर लागते वर्णी
पालिकेतील स्थायी, परिवहन, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, अर्थ, नियोजन, बालकल्याण, आदी समित्यांवर नगरसेवकाची सभापती म्हणून वर्णी लागते.
आमदारकीची पहिली पायरी
नगरसेवक, महापौर झाल्यानंतर हा मार्ग आमदारकीपर्यंत जातो. वरच्या सभागृहात जाण्याचा मार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जातो. त्यामुळे अनेक जण आमदारकीचे स्वप्न पाहतात.
विकास निधी कुणाला किती?
महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाला वर्षाला १ ते १.५ कोटी रुपये विकासकामांसाठी मिळू शकतात, ज्यात नगरसेवक निधी आणि अतिरिक्त निधीचा समावेश असतो. विशेष प्रकल्पांसाठी महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडून अतिरिक्त निधीची मागणी करता येते.
विकासनिधीतून होतात ही कामे
रस्ते, गटार दुरुस्ती, पथदिवे, स्वच्छता, सार्वजनिक उद्यान, पाणीपुरवठा, ड्रेनेज सुधारणा, आदी कामे नगरसेवकाच्या माध्यमातून केली जातात.