मालेगावी भाजपच्या नेत्यांनी युतीला दर्शविला उघड विरोध, कारस्थान कुणाचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:54 IST2025-12-30T13:53:12+5:302025-12-30T13:54:38+5:30
प्रमोद बच्छाव, अद्वय हिरे, भाजपचे माजी गटनेते गायकवाड थेटच बोलले

मालेगावी भाजपच्या नेत्यांनी युतीला दर्शविला उघड विरोध, कारस्थान कुणाचे?
मालेगाव उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एकच दिवस शिल्लक राहिलेला असतानाही भाजप-शिंदेसेना यांच्यातील युतीबाबतची खलबते सुरुच असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र शिंदेसेनेसोबत युती न करण्याची भूमिका घेत उघड विरोध दर्शविला. शिंदेसेनेसोबत युती केल्यास निवडणुकीत तटस्थ राहण्याचा इशारा दिल्याने मालेगावातही पदाधिकाऱ्यांचा रोष उफाळून आला.
येथील पश्चिम भागात शिंदेसेना व भाजप युतीवरून नाट्य सुरू असतानाच सोमवारी (दि. २९) युती करण्यावरून भाजपमध्येच गटबाजी उफाळून आली. भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले प्रमोद बच्छाव, अद्वय हिरे यांच्यासह भाजपचे माजी गटनेते सुनील गायकवाड यांनी शिंदेसोबत न जाण्याची भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली. राज्यपातळीवर शिंदेसेना भाजपची युती असली तरी मालेगावात अद्याप युती झालेली नाही. या युतीसाठी अजूनही चर्चा सुरू असतानाच सोमवारी भाजपमध्ये युतीवरून सरळसरळ गट पडले. पदाधिकारी व विरुद्ध इतर असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीत यंदाही दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपमध्ये नव्याने दाखल झालेले बाजार समितीचे माजी सभापती अद्वय हिरे व प्रमोद बच्छाव यांच्यासह भाजपचे माजी गटनेते सुनील गायकवाड यांनी युतीच्या विरोधात नकार घंटा वाजवत युती झाल्यास तटस्थ राहणार असल्याची भूमिका घेतली. तर दुसरीकडे भाजपमध्ये दाखल झालेले प्रसाद हिरे यांनी मात्र पक्षनेत्यांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे सांगितले.
निवडणुकीतून माघार घेण्याची गायकवाडांची घोषणा
भाजपचे माजी मनपा गटनेते सुनील गायकवाड यांनी युती झाल्यास निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे घोषित केले. वास्तविक गायकवाड यांनी पहिल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला एका जागेवर विजय मिळवून दिला होता. त्यानंतर २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच ९ जागा जिंकल्या होत्या. पक्षातील काही नेत्यांच्या अट्टाहासाविषयी त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली तर पक्षात नव्याने सामावून घेतलेल्यांचे बळ कधी अजमवणार, असाही प्रश्न उपस्थित केला.
बच्छाव यांचा तटस्थ राहण्याचा इशारा
भाजपचे तालुक्यातील नेते माजी सभापती प्रमोद बच्छाव यांनी देखील विरोध दर्शवत युती झाल्यास वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असल्याचे म्हटले आहे. ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची असते. या युतीसाठी काही जण अट्टाहास करत असून युती झाली तर आपण त्या मंचावर न जाता तटस्थ राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
वैयक्तिक फायद्यासाठी युतीचा प्रयत्न ?
या युतीविषयीची भूमिका विशद करताना अद्वय हिरे यांनी पक्षाने युती केल्यास इच्छुक कार्यकर्त्यांना थांबवणार कसे, असा प्रश्न निर्माण होईल, असे सांगितले. पक्षाची १६ ते १७ जागांवर विजय मिळविण्याची क्षमता असताना पदाधिकारी स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी पक्षाचे नुकसान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. युती झाल्यास आपण तटस्थ राहणार असल्याचे सांगितले.
पक्षश्रेष्ठी देतील तो आदेश मान्य
या तिघांनी युतीला विरोध केला असला तरी प्रसाद हिरे यांनी मात्र पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय आपल्याला मान्य राहणार असल्याचे म्हटले. पक्षाचे जे काही निर्णय होतील ते सर्व पक्षाच्या भल्यासाठी असतील, त्यामुळे पक्षापेक्षा कोणीही स्वतःला श्रेष्ठ समजून नये, असा सल्लाही त्यांनी दिला.