निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:45 IST2026-01-01T16:44:55+5:302026-01-01T16:45:14+5:30
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी १९४ मुक्त निवडणूक चिन्हांचा समावेश आहे.

निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी १९४ मुक्त निवडणूक चिन्हांचा समावेश आहे. या यादीत सफरचंद, बिस्कीट, पाव, केक, ढोबळी मिरची यांसह विविध खाद्यपदार्थाची, तसेच कृषी उत्पादनांशी निगडित चिन्हांचा समावेश आहे. फुलकोबी, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस, भेंडी, मका, भुईमूग, वाटाणे, पेरू, अननस, कलिंगड, अक्रोड, जेवणाची थाळी अशी अनेक चिन्हें अपक्ष उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवारांना तसेच अमान्यताप्राप्त (नोंदणीकृत) राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हांमधून चिन्ह निवडता येणार आहे. चिन्हवाटपाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. येत्या २ जानेवारी २०२६ रोजी अर्ज माघारीनंतर आणि त्यानंतर ३ जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप स्पष्ट होणार आहे.
'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
इस्लाम पक्षासाठी ऑटोरिक्षा हे चिन्ह मिळावे, अशी मागणी माजी आमदार आसीफ शेख यांनी मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे केली आहे. अपक्ष उमेदवारांना अर्ज भरताना किमान तीन मुक्त चिन्हांचा अग्रक्रम देणे बंधनकारक असून पक्षाच्या उमेदवारांनी पहिल्या क्रमांकावर 'रिक्षा' चिन्हाची निवड केल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हांवरच उमेदवार उभे करण्याची मुभा आहे. मुक्त चिन्हांची यादी त्यांना लागू होत नाही. राष्ट्रीय पातळीवरील ५, राज्यस्तरीय ५ आणि इतर राज्यांतील ९ असे एकूण १९ पक्षांची चिन्हे राखीव ठेवण्यात आली आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे अमान्यताप्राप्त; पण नोंदणीकृत ४१६ राजकीय पक्षांची नोंद आहे.