Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:21 IST2026-01-01T15:20:34+5:302026-01-01T15:21:46+5:30
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव येथील महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एकूण ८१२ इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.

Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
मालेगाव येथील महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एकूण ८१२ इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. दाखल उमेदवारी दाखल अर्जाची बुधवारी (दि. ३१) पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये १५ अर्ज बाद ठरविण्यात आल्याने वैध अर्जाची संख्या ७९७ झाली आहे. बाद अर्जाच्या संदर्भात निर्माण झालेल्या अडचणींमुळे पुनर्पडताळणीचे काम काम रात्री उशिरापर्यंत करण्यात येत होते.
महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी निवडणूक होत असून, सात केंद्रावर उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची पडताळणी करण्यात आली. यावेळी सुरुवातीला नियमाप्रमाणे एका प्रभागात एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल इच्छुक उमेद्वारांकडून कोणत्या अर्जाची छाननी करून घ्यावी, असा अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष अर्ज पडताळणीस सुरुवात करण्यात आली. या प्रक्रियेत एकूण १५ अर्ज बाद ठरले. मनपाच्या जुन्या इमारतीत असलेल्या केंद्रात एमआयएमच्या फिरदोस अय्याज अहमद यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला, तर वाडीया रुग्णालयातील केंद्र क्रमांक ६ मध्ये रईस अहमद अब्दुल अजीज, यास्मिन बानो शेख रफिक या दोघांचे, तर मनपाच्या प्रभाग समिती २ च्या कार्यालयात केंद्र क्रमांक ३ मध्ये तिघांचे अर्ज फेटाळण्यात आले.
मनपाच्या प्रभाग ३ मधील शेख अश्फाक शेख अमीन मतदार यादीत प्रस्तावकाचे नाव नसल्याने, तर प्रभाग सातमधील अ चा उमेदवार मोहम्मद मुस्तकीम मोहम्मद मुस्तफा यांचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र पावती नसल्याने त्यांचे अर्ज बाद ठरले. त्याच प्रभागातील क जागेचे उमेदवार अन्सारी शमा गुलाम नबी उमेदवाराचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे फेटाळण्यात आले आहे. उर्वरित केंद्रांपैकी १ क्रमांकाच्या केंद्रावर १४० पैकी १ अर्ज अनामत रक्कम न भरल्याने, पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने व शपथपत्र नसल्याने फेटाळण्यात आला आहे, तर आयएमए हॉलमधील केंद्र क्र. २, दिलावर हॉलमधील केंद्र क्रमांक ४ व ऊर्दू घर येथील क्र. ७ या ठिकाणी दाखल झालेले सर्वच्या सर्व अर्ज या पडताळणीत वैध ठरले आहेत.
अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
या पडताळणीच्या वेळी काही केंद्रावर उशिरा पर्यंत पडताळणीच काम सुरु होते. तर काही केंद्रावर दाखल अर्ज व पडताळणी अंती वैध अर्ज यांच्यात तफावत आढळुन आल्याने या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पुन्हा पडताळणी केली. त्यामुळे अधिकृत आकडेवारी येण्यास मोठा उशीर झाला.
उद्या होणार माघार
निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवारी (दि.२) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे तर दि. ३ जानेवारी रोजी अंतिम उमेदवारांच्या नावांची यादी घोषित केली जाणार आहे.
तहसील कार्यालय, आयएमए हॉल, मनपा प्रभाग समिती २ कार्यालय, दिलावर हॉल, मनपा जुनी इमारत, वाडीया रुग्णालय व ऊर्दू घराचा समावेश आहे. या प्रत्येक केंद्रांवर एका वेळेस एकास प्रभागाच्या उमेदवारांना पडताळणी ठिकाणी प्रवेश देण्यात येत होता. यावेळी उर्वरीत दोघा प्रभागांच्या उमेदवारांना केंद्राच्या परिसरात घुसण्यास मज्जाव करण्यात आला होता.