मालेगाव मनपा निवडणुकीकडे प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पाठ; प्रचारासाठी शिंदेसेना, भाजपचा स्थानिक नेत्यांवर भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:39 IST2026-01-10T12:38:48+5:302026-01-10T12:39:21+5:30

काँग्रेसला काही नेत्यांची प्रतीक्षा

Major party leaders back Malegaon Municipal Corporation elections; Shinde Sena, BJP focus on local leaders for campaigning | मालेगाव मनपा निवडणुकीकडे प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पाठ; प्रचारासाठी शिंदेसेना, भाजपचा स्थानिक नेत्यांवर भर 

मालेगाव मनपा निवडणुकीकडे प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पाठ; प्रचारासाठी शिंदेसेना, भाजपचा स्थानिक नेत्यांवर भर 

प्रवीण साळुंखे 

येथील महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी अवघे पाच दिवस उरले असून, दोघांचा अपवादवगळता इतर पक्षांच्या नेत्यांची अद्याप एकही मोठी सभा झालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनी मालेगावकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. त्यात भाजप व शिंदेसेनेने प्रचारासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या खांद्यावर धुरा दिल्याचे चित्र आहे.

येथील महापालिका जानेवारीला निवडणुकीसाठी ३ निवडणूक चिन्हाचे वाटप झाले असून, त्यासाठी प्रत्यक्ष प्रचारास सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष प्रचाराला फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. बुधवारी (दि. १४) जाहीर प्रचार करता येणार नाही. त्यामुळे या ४ दिवसात राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा घेण्याचे आतापर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत वंचित बहुजन आघाडी सोडल्यास इतर एकाही पक्षाच्या नेत्याने शहरात प्रचारासाठी येण्यास दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे यंदाची मनपा निवडणुकीकडे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी पाठ फिरविल्याचे निश्चित झाले आहे.

एमआयएम खासदार ओवेसी यांची सभा

या निवडणुकीत एमआयएम १६ प्रभागांतून ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून, त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमंत्रित केले होते. त्यावर पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शहरातील आयेशानगर भागात सभा घेऊन स्थानिक पातळीवर त्याचे राजकीय विरोधकांवर टीका करीत आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी एमआयएमच्या आगामी महापौराचे नाव घोषित केले.

काँग्रेस पक्षातर्फे नेत्यांशी बोलणी सुरू

येथील काँग्रेस पक्षाने शहराध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली १९ जागांवर उमेदवार दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या निवडणूक प्रचारासाठी राज्याचे नेते शहरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगढी यांच्यासह अजून एका नेत्याशी बोलणे सुरू आहे. आगामी एक दोन दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व गिरीश महाजन हे भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी ४ जानेवारीला शहरात आले होते. यावेळी त्यांनी एका मंगल कार्यालयात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची सभा घेतली होती. तेवढा अपवाद वगळता एकही नेता मालेगावकडे फिरकलेला नाही.

वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आज शहरात

येथील मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, इस्लाम व समाजावादी पार्टी युतीच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटमध्ये सामील झाले होते. मात्र इस्लाम पार्टीने या युतीत प्रभाग २ मधील अनुसूचित जातीची जागा वंचितसाठी सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी इस्लामचा एक उमेदवार वंचित विरोधात रिगंणात उतरविल्याने वंचित या युतीतून बाहेर पडले आहे. त्यांनी मनपा निवडणुकीत ४ जागांवर उमेदवार दिले असून, शनिवारी (दि. १०) त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी सभेच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती मनपाचे सहायक आयुक्त दिनेश मोरे यांनी दिली आहे.

तीनच मोठे नेते आतापर्यंत शहरात

मालेगाव मनपाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपचे दोन तर एमआयएमचे एक असे तीनच नेते शहरामध्ये येऊन गेले. एमआयएमतर्फे शहरात जाहीर प्रचार सभा घेण्यात आली. तर भाजपच्या नेत्यांनी छोटेखानी बैठकांमध्ये आपल्या नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.

Web Title : मालेगाँव चुनाव में प्रमुख दलों की उपेक्षा; स्थानीय नेताओं पर ध्यान केंद्रित

Web Summary : मालेगाँव नगर निगम चुनावों में प्रमुख दलों की उपेक्षा, प्रचार के लिए स्थानीय नेताओं पर निर्भरता। एमआईएम के ओवैसी ने रैली की। प्रकाश आंबेडकर आने वाले हैं। कांग्रेस प्रमुख नेताओं की तलाश में है।

Web Title : Major Parties Ignore Malegaon Election; Focus on Local Leaders

Web Summary : Major parties neglect Malegaon municipal elections, relying on local leaders for campaigning. MIM's Owaisi held a rally. Prakash Ambedkar is expected. Congress seeks key leaders.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.