३०१ उमेदवार ९ लाखांची मर्यादा; २७ कोटींची दौलतजादा होणार! प्रचारातील रणधुमाळी पाहाता खर्चाची मर्यादाही ओलांडली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:55 IST2026-01-13T16:53:24+5:302026-01-13T16:55:07+5:30
मालेगाव महापालिका ही 'ड' वर्ग महापालिका असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक उमेदवाराला ९ लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

३०१ उमेदवार ९ लाखांची मर्यादा; २७ कोटींची दौलतजादा होणार! प्रचारातील रणधुमाळी पाहाता खर्चाची मर्यादाही ओलांडली जाणार
मालेगाव : मनपा निवडणुकीत २१ प्रभागांतील ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यातील प्रभाग ६ च्या 'क' जागेची निवडणूक बिनविरोध ठरली आहे. त्यामुळे या जागेची मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
महापालिकेसाठी ३०१ उमेदवार रिंगणात असून त्यातील एक महिला उमेदवार बिनविरोध ठरली आहे. त्यामुळे येत्या १५ जानेवारीला ३०० जागांसाठी निवडणूक होत आहे.
येथील महापालिका ही 'ड' वर्ग महापालिका असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक उमेदवाराला ९ लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
मर्यादेत २७ कोटींचा खर्च
येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण ३०१ उमेदवार असून त्यातील एक उमेदवार बिनविरोध निवडणून आली आहे. त्यामुळे मनपाच्या निवडणुकीत ३०० उमेदवार असून, त्यांचा सर्वांचा खर्च २७ कोटी रुपये होणार आहे.
'अनऑफिशिअल' खर्चाचा तर हिशेबच नाही
मनपा निवडणुकीत अधिकृत खर्चाबरोबरच अनाधिकृत खर्च मोठा आहे. या खर्चाचे कोणतेही पुरावे नसले तरी उमेदवारनिहाय ५० लाखांपेक्षा जास्तीचा हा खर्च होत असल्याचे दिसते.
निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते
निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी स्वंतत्र बँक खाते उघडावे लागते. या खात्यातून त्यांना निवडणुकीचा खर्च करावा लागतो. त्यातही एकाच ठिकाणचा खर्च १० हजारांपेक्षा जास्त असल्यास तो धनादेश व ऑनलाइन दयावा लागतो.
सर्वाधिक खर्च कोणत्या गोष्टींवर?
मनपा निवडणुकीत सर्वच बाबींवर खर्च होत असला तरी सर्वांत जास्त खर्च हा प्रचाराबरोबरच मतदार व कार्यकर्त्यांच्या जेवणावळी होतो. त्यात चहा, पाणी, नाश्ता व दोन वेळेच्या जेवणाचा समावेश आहे.
३० दिवसांच्या आत हिशेबाचे सादरीकरण
मनपा निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या सर्वच उमेदवारांना आपल्या निवडणूक खर्चाचे सादरीकरण करणे आवश्यक असून, त्यासाठी निवडणूक संपल्यानंतर ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
ऑनलाइन खर्चाच्या सादरीकरणासाठी टू व्होटर अॅप
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष खर्च सादर करण्याची गरज नाही. त्यांनी ऑनलाइन खर्च सादर केला तरी चालण्यासारखे असून, त्यासाठी निवडणूक विभागाने टु व्होटर अॅप दिल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
पै-पैचा हिशेब ठेवावा लागणार
निवडणूक उमेदवारांना रोज दिवसभरात प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाच्या एक-एक रुपयांचा नव्हे, तर पैशांचा हिशेब ठेवणे क्रमप्राप्त आहे.
