मालेगावात ४३ इमारतींमधील २१७ मतदान केंद्र संवेदनशील; कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:11 IST2026-01-07T16:10:09+5:302026-01-07T16:11:11+5:30
मालेगाव पोलिसांकडून केंद्र परिसराची पाहणी

मालेगावात ४३ इमारतींमधील २१७ मतदान केंद्र संवेदनशील; कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान
मालेगाव : मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून, एकूण २१७ मतदान केंद्रे संवेदशनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी या मतदान केंद्रांवरील कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी, यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रांची पोलिस प्रशासनाकडून पाहणी करण्यात येऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला.
शहरात प्रचाराचा जोर वाढला असतानाच, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. निवडणुकीत शहरातील ६०९ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यापैकी ४३ इमारतींमधील २१७ केंद्रे संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. शहरातील ८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रांचा या यादीत समावेश आहे. दि. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने प्रशासनाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
आझादनगर भागात सर्वाधिक संवेदनशील केंद्रे
शहरातील सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असून, येथे ४ इमारतींमधील ४८ केंद्रे संवेदनशील आहेत. मालेगाव कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत ९ इमारतींमधील ४६, पवारवाडी पोलिस ठाण्यात ६ इमारतींमधील ३७, शहर पोलिस ठाण्यात ४ इमारतींमधील ३१, आयशानगरमध्ये ४ इमारतींमधील २१, तर किल्ला पोलिस ठाणे हद्दीत ६ इमारतींमधील २१ केंद्रे संवेदनशील म्हणून नोंदवण्यात आली आहेत.
२,३०० पोलिसांचा बंदोबस्त प्रस्तावित
मतदानाच्या दिवशी सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी २,३०० पोलिसांचा प्रस्ताव उच्चस्तरावर मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, यामध्ये १,५०० पोलिस कर्मचारी व ८०० होमगार्ड यांचा समावेश आहे. परिस्थितीनुसार अतिरिक्त मनुष्यबळही तैनात करण्यात येणार आहे.
पोलिस ठाणे इमारती संवेदनशील केंद्र
मालेगाव शहर ४ ३१
आझादनगर ४ ४८
आयशानगर ४ २१
पवारवाडी ६ ३७
रमझानपुरा ४ २८
कॅम्प ९ ४६
छावणी ३ १५
किल्ला ६ २१
संवेदनशीलतेमागाची कारण
१. प्रत्येक संवेदनशील मतदान केंद्राबाबत कारणेनिहाय नोंद ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये मिश्रवस्ती, पूर्वी झालेल्या दोन समाजांतील वाद, गर्दीची ठिकाणे, केंद्राजवळ माजी नगरसेवकांचे निवासस्थान, तसेच पक्षीय कार्यालये व कार्यकर्त्यांची उपस्थिती अशा बाबींचा समावेश आहे.
२. मतदानाच्या दिवशी केंद्रांवर गर्दी असणार आहे. या केंद्रांवर वाढीव पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांनी विविध केंद्र इमारतींची पाहणी करत नियोजनकामी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.