‘एबी फॉर्म’ म्हणजे काय रे भाऊ? तो भरायचा कसा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:30 IST2025-12-30T10:28:37+5:302025-12-30T10:30:27+5:30
What is AB Form: हा ‘एबी फॉर्म’ ज्याला मिळतो त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्ह दिले जाते...

‘एबी फॉर्म’ म्हणजे काय रे भाऊ? तो भरायचा कसा?
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी राज्यभर विविध युती व आघाड्यांमध्ये जागा वाटपाच्या अखेरच्या डावपेचांची सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षांचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची पळवापळवी सुरू आहे. तर काही ठिकाणी ‘आमचा उमेदवार तुमचा, तुमचा आम्हाला’ या स्वरूपातील करार होत आहेत, ज्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे ‘एबी फॉर्म’. हा ‘एबी फॉर्म’ ज्याला मिळतो त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्ह दिले जाते.
काय असतो एबी फॉर्म? (What is AB Form)
एबी फॉर्म हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळविण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज असतो.
ए फॉर्म हा त्या पक्षाच्या मान्यतेचा अधिकृत कागद आहे.
ए फॉर्मवर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.
‘बी फॉर्म’ हा अधिकृत उमेदवारासंदर्भात दस्तावेज आहे.
‘बी फॉर्म’वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचे नाव असते. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत ठरवू शकतो.
‘बी’ फॉर्म देण्याचे कारण काय?
राजकीय पक्ष आपल्या अधिकृत उमेदवाराला ‘ए’ फॉर्म देतात. त्यात उमेदवाराचे नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात.
काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरू शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून ‘बी’ फॉर्म दिला जातो.
‘बी’ फॉर्ममध्ये प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचे नाव दिलेले असते. पडताळणीवेळी अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतो.
...तर अर्ज होतो बाद
उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी अगदी काटेकोरपणे तपासल्या जातात.
अर्जात पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला ‘एबी फॉर्म’ द्यावाच लागतो.
अन्यथा त्याचा अर्ज बाद होतो व त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही.