भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 00:17 IST2026-01-02T00:16:11+5:302026-01-02T00:17:47+5:30
Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत आचार संहितेचे सर्वत्र राजरोस उल्लंघन होत असताना देखील पोलीस, महापालिका व आचार संहिता पथके कारवाई करत नसल्याची बातमी लोकमतने दिली होती. भाईंदर पूर्व येथील भाजपा नेत्यांच्या उपस्थितील राजकीय हळदीकुंकू कार्यक्रम व भेटवस्तू वाटप प्रकरणी सुमारे १५० ते २०० नागरिकांच्या तक्रारी नंतर तब्बल ८ दिवसांनी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
आचार संहिता लागू असताना २३ डिसेंबर रोजी भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट फेस ११ व १२ मध्ये मे. सिद्धिविनायक सेवा चारिटेबल ट्रस्ट ह्या नावाने ज्ञानमती मिश्रा यांनी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बॅनरवर भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचे छायाचित्र तर कार्यक्रमास मेहतांसह इच्छुक उमेदवार, भाजपा पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी राजकीय नेत्यांचे सत्कार केले गेले तसेच जमलेल्या मतदार महिलांना पक्षाचे स्टिकर लावून भेटवस्तूंचे वाटप केले गेले होते व त्या बाबतचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होऊन सुमारे १५० ते २०० नागरिकांनी ईमेल द्वारे तक्रारी केल्या होत्या. मात्र थेट सत्ताधारी पक्षाशी संबंधित तक्रार असल्याने तात्काळ गुन्हा दाखल करण्या ऐवजी प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांना पत्र देऊन कारवाईस सांगितले गेले. तर नवघर पोलीस ठाण्याने देखील कारवाईस टाळाटाळ केली.
दरम्यान शहरात असे अनेक कार्यक्रम द्वारे आचार संहितेचे उल्लंघन होत असताना पोलीस, महापालिका आणि आचार संहिता पथके डोळेझाक करून आहेत. आलेल्या तक्रारींवर पण कारवाई न करता निवडणुकीतील उघड भ्रष्टाचार व गैरप्रकार ह्याला संरक्षण दिले जात असल्याची टीका होऊ लागली. त्या बाबत लोकमतने बातमी दिली. अखेर ३१ डिसेम्बर रोजी नवघर पोलिसांनी केवळ अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी समोर असताना देखील केवळ अनोळखी व्यक्ती वर गुन्हा दाखल केल्याने प्रशासनच आचार संहिता भंग करण्यास व करणारे यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत जागरूक नागरिकांनी पोलीस आणि पालिका अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच अन्य आचार संहिता उल्लंघनाच्या तक्रारींवर पण तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.