अंधारी नदीपात्रात वाहून गेलेल्या वाघामुळे खळबळ, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 11:27 IST2025-09-14T11:26:12+5:302025-09-14T11:27:36+5:30
चंद्रपुरात गोंडपिपरी–पोंभुर्णा सीमेवरील अंधारी नदीपात्रात शुक्रवारी वाघ मृतावस्थेत आढळून आला.

अंधारी नदीपात्रात वाहून गेलेल्या वाघामुळे खळबळ, तपास सुरू
गोंडपिपरी (चंद्रपूर): गोंडपिपरी–पोंभुर्णा सीमेवरील अंधारी नदीपात्रात शुक्रवारी वाघ मृतावस्थेत आढळून आला. काहींनी त्याचे चित्रीकरण करून व्हायरल केले. यानंतर तेथून वाघाचा मृतदेह वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
नदीतून वाहत आलेल्या वाघाचे दृश्य अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केले. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. वनविभागाला माहिती मिळताच पथके घटनास्थळी रवाना झाली, मात्र पाण्याचा विसर्ग वाढल्याने मृतावस्थेतील वाघ पुढे वाहून गेला. त्यामुळे अद्याप वाघाचा मृतदेह सापडलेला नाही. तो कोणत्या क्षेत्रातील वाघ आहे, याचाही शोध सुरू आहे.
दरम्यान, शेतशिवारात रानडुकरांचा त्रास मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी विद्युततारा वापरून शिकार करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे वाघाचा मृत्यू नैसर्गिक होता की करंटमुळे झाला, याबाबत संभ्रम आहे. मृतदेह हाती आल्यानंतरच खरा खुलासा होणार आहे.