Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:15 IST2025-08-31T16:14:38+5:302025-08-31T16:15:55+5:30
Dharavi: पुनर्विकास झाल्यावर तरी या मुलांचे हरवलेले बालपण परत मिळेल का? असा प्रश्न पालकांसह सेवाभावी संस्थांना पडला आहे.

Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: खेळाची मैदाने आणि मोकळ्या जागांचा अभाव, दर्जेदार शिक्षणाची वानवा, अस्वच्छता, प्रदूषण आणि त्यामुळे सतत बिघडणारी प्रकृती, दारिद्रय, भविष्याची चिंता, आर्थिक संकटांमुळे नाईलाजाने करावी लागणारी बालमजुरी अशा अनेक समस्यांमध्ये धारावीतल्या मुलांचे बालपण हरवून गेले आहे. पुनर्विकास झाल्यावर तरी या मुलांचे हरवलेले बालपण परत मिळेल का? असा प्रश्न पालकांसह सेवाभावी संस्थांना पडला आहे.
धारावीत गटई काम करणाऱ्या अनिल भंडारी यांनी लहान मुलांच्या दैनंदिन आयुष्यातील संघर्षाबद्दल हळहळ व्यक्त केली. मला ३ मुले आहेत. पण तिघेही दिवसभर घरीच असतात. मुलांना मैदानी खेळ खेळता येत नाही. धारावीत माझे बालपण खेळण्याशिवाय गेले आणि आता मुलाचे बालपण वाया जात आहे.
राजीव गांधी नगरमध्ये राहणाऱ्या रेहान सय्यद यांनी मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली. माझ्या मुलींना मी घराबाहेर बिलकुल जाऊ देत नाही. जवळपास ग्रंथालय नाही, जिथे माझ्या मुली वाचनासाठी जाऊ शकतील. घरीच असल्याने त्या वारंवार मोबाईल बघतात. त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतोय, याची जाणीव मला आहे. पण माझा नाईलाज आहे. कारण मुलांना बाहेर पाठवले तर त्यांना व्यसन लागण्याची भीती आहे.
शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम
कायदेविषयक सल्लागार नूर खान गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून धारावीत सक्रिय आहेत.उपलब्ध शाळा आणि विद्यार्थी यांचे व्यस्त प्रमाण, यामुळे प्रत्येक वर्गात होणारी गर्दी, खेळाचे मैदान, ग्रंथालय अशा मूलभूत सुविधांशिवाय सुरू
असणाऱ्या शाळा यामुळे धारावीतल्या मुलांना शिक्षणाविषयी प्रेम किंवा आपुलकी जाणवतच नाही. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत आहे, अशी माहिती खान यांनी दिली.
शिक्षणाच्या अभावामुळे दारिद्र्याचे दुष्टचक्र
- कचरा गोळा करून चरितार्थ चालविणाऱ्या संतोषी शिवराम कांबळे गेल्या ३ दशकांपासून धारावीतील महात्मा गांधी चाळीत राहत आहेत. माझा जन्म धारावीत झाला.
- जन्मापासून धारावीची झोपडपट्टी मी जवळून बघतेय. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव यामुळे लहान मुलांना दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडताच येत नाही.
- हलाखीच्या परिस्थितीमुळे लहान मुले आपसूकच मजुरी, घरकाम, कचरा वेचणे आणि इतर हलक्या कामांकडे वळतात.