फास्टॅगमधून कापलेली रक्कम मिळणार परत; चाकरमान्यांच्या संतापानंतर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 07:15 IST2023-09-19T06:10:41+5:302023-09-19T07:15:12+5:30
टोलमाफी असताना काही वाहनांच्या फास्टॅगमधून रक्कम गेली आहे.

फास्टॅगमधून कापलेली रक्कम मिळणार परत; चाकरमान्यांच्या संतापानंतर निर्णय
मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी दिली. असे असताना टोलनाक्यावरून जाणाऱ्या चाकरमान्यांच्या फास्टॅगमधून टोलवसुली केली गेली. यामुळे चाकरमानी संतापले. त्यांच्या रोषानंतर परिवहन विभाग फास्टॅगमधून कापलेले पैसे संबंधितांना परत करणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफीचा निर्णय घेऊनही गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली गेल्याने काहींनी परिवहन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
टोलमाफी असताना काही वाहनांच्या फास्टॅगमधून रक्कम गेली आहे. याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविणार आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेतल्यास वाहन चालकांना त्यांची रक्कम परत मिळेल, असे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले.