नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: August 31, 2025 10:50 IST2025-08-31T10:49:24+5:302025-08-31T10:50:14+5:30
राज्यात साक्षरतेच्या बाबतीत सर्वात शेवट असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील आदिवासींच्या शिक्षणाचा प्रश्न सुटता सुटेना अशी अवस्था आहे.

नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात साक्षरतेच्या बाबतीत सर्वात शेवट असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील आदिवासींच्या शिक्षणाचा प्रश्न सुटता सुटेना अशी अवस्था आहे. रस्ते, पूल नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील मालीआंबा येथील तीन पाड्यातील विद्यार्थ्यांना एक नव्हे तर तब्बल दोन नद्या पार करुन शाळेत जावे लागत आहे. त्यासाठी पालकांनाही धोका पत्करुन आपल्या बाळांना खांद्यावर घेऊन नदी पार करण्याची कसरत करावी लागत आहे.
५० गावांत गंभीर स्थिती
सातपुड्यात अनेक गावांना रस्ते, पूल नाहीत. सरदार सरोवरच्या पाणलोटामुळे काही गावांना टापूचे स्वरुप प्राप्त झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच केलखेडी येथील झाडावरुन नदी पार करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्थिती ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर तेथे प्रशासनाने तात्काळ साकव बांधला आहे. तथापि, अशी ५० पेक्षा अधिक गावांची स्थिती आहे.
दोन नद्या करतात पार
डाब ग्रामपंचायत अंतर्गत मालीआंबा गावाचे पिंपळदोपाडा, तामनाईमाळपाडा व इऱ्यापिऱ्या डोंगरपाडा हे तीन पाडे वरखेडी नदीच्या पलिकडे आहेत. या पाड्यांची लोकसंख्या १२७८. येथील लोकांना वरखेडी नदी पार करुन बाहेर जावे लागते. तिन्ही पाड्यातून जिल्हा परिषद शाळेत जाणारी २१ मुले आहेत तर अंगणवाडीत जाणारी ४० बालके.