राज्यातील सहा डॉक्टर लोकसभेवर; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांचे प्रश्न संसदेत मांडण्याची अपेक्षा

By संतोष आंधळे | Published: June 8, 2024 06:46 AM2024-06-08T06:46:03+5:302024-06-08T06:46:58+5:30

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनुसार, वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची राज्यातील संख्या जवळपास एक लाख ८० हजार इतकी आहे.

Six doctors from the state in the Lok Sabha; Expect to raise the issue of hospitals in the public health system in Parliament | राज्यातील सहा डॉक्टर लोकसभेवर; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांचे प्रश्न संसदेत मांडण्याची अपेक्षा

राज्यातील सहा डॉक्टर लोकसभेवर; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांचे प्रश्न संसदेत मांडण्याची अपेक्षा

मुंबई : यंदा राज्यातील मतदारांनी सहा डॉक्टर उमेदवारांना लोकसभेवर निवडून दिले, तर चार डॉक्टरांना घरी बसविले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सात डॉक्टर जिंकले होते. यावेळी ही संख्या घटली असली तरी डॉक्टर खासदारांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालये आणि  डॉक्टरांचे प्रश्न संसदेत मांडावेत, अशी अपेक्षा वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.    

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनुसार, वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची राज्यातील संख्या जवळपास एक लाख ८० हजार इतकी आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा यासाठी अनेक वर्षांपासून डॉक्टरांच्या विविध संघटना आग्रही आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी डॉक्टरांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन कायदे केले आहेत.

मात्र, पोलिसांनाच या कायद्यांबाबत अधिक माहिती नसल्यामुळे हल्लेखोरांवर त्या कायद्यांतील कलमानुसार कारवाई केली जात नसल्याची प्रकरणे राज्यात घडली आहेत. राज्यात सध्या महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन आणि मेडिकेअर सेवा संस्था अधिनियम, २०१० असा कायदा आहे. 

विजयी डॉक्टर उमेदवार 
१. डॉ. श्रीकांत शिंदे, एमएस ऑर्थो (कल्याण)  
२. डॉ. शिवाजी काळगे, नेत्ररोगतज्ज्ञ (लातूर) 
३. डॉ. हेमंत सावरा, एमएस ऑर्थो (पालघर) 
४. डॉ. अमोल कोल्हे, एमबीबीएस (शिरूर) 
५. डॉ. प्रशांत पडोळे, एमबीबीएस (भंडारा-गोंदिया)
६. डॉ. शोभा बच्छाव, होमिओपॅथी (धुळे) 

पराभूत डॉक्टर उमेदवार 
१. डॉ. सुभाष भामरे, कर्करोग तज्ज्ञ (धुळे)  
२. डॉ. भारती पवार, एमबीबीएस (दिंडोरी) 
३. डॉ. हीना गावित, एमडी- मेडिसिन (नंदुरबार) 
४. डॉ. सुजय विखे पाटील, एमसीएच-न्यूरोसर्जरी (अहमदनगर) 

मी जे. जे. रुग्णालयाशी संलग्न ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे. वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टरांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याची मला कल्पना आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी हा प्रश्न संसदेत मांडणार आहे. 
- डॉ. हेमंत सावरा, खासदार, पालघर

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय कायद्याची आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही अनेक वर्षांपासून त्याची मागणी करत आहोत. ती आता तरी मान्य केली जाईल, अशी अपेक्षा आहे. नवनिर्वाचित खासदारांची भेट घेऊन आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडणार आहोत.  
- डॉ. गिरीश लाड, अध्यक्ष (मुंबई), 
इंडियन मेडिकल असोसिएशन 

Web Title: Six doctors from the state in the Lok Sabha; Expect to raise the issue of hospitals in the public health system in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.