Shivsainik tried convince Ex MLA Vani in vaijapur | वैजापूरातून निवडणूक लढवण्यासाठी, शिवसैनिकांकडून वाणींची मनधरणी

वैजापूरातून निवडणूक लढवण्यासाठी, शिवसैनिकांकडून वाणींची मनधरणी

मोबीन खान 

मुंबई - वैजापूर मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रिक करणारे माजी आमदार रंगनाथ वाणी यांचा गेल्यावेळी राष्टवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पराभव केला होता. तर यावेळी विधानसभा निवडणुकीत प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचे वाणी यांनी स्पष्ट करत माघार घेतली होती. त्यामुळे सेनेला वैजापूर मतदारसंघात उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. मात्र वाणी यांनी पुन्हा निवडणूक लढवावी यासाठी शिवसैनिक त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे.

वैजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. १९९९ ते २००९ पर्यंत रंगनाथ वाणी यांनी सलग तीनवेळा इथे भगवा फडकवला. गेल्यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला होता. तर काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे वाणी यांनी जाहीर केले होते. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे ही जागा शिवसेना कोणत्याही परिस्थिती सोडणार नाही हे निश्चित आहे.

वाणी यांनी माघार घेतल्याने सेनेकडे वैजापूरमधुन प्रभावी चेहरा नसल्याने उमेदवाराची शोधाशोध करावी लागत आहे. तर दुसरीकडे शिवसैनिक गेल्या तीन दिवसांपासून वाणी यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर वाणी यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी तालुक्यातील शिवसेनेचा एक गट मुंबईत तळ ठोकून असल्याचे सुद्धा चर्चा पाहायला मिळत आहे.

मात्र याबाबत माजी आमदार वाणी हे 'लोकमत'शी बोलताना  म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक मी लढवावी यासाठी तालुक्यातील शिवसैनिक आग्रही आहेत. मात्र निवडणूक न लढवण्याचा ,माझा निर्णय झाला असून त्यावर मी ठाम आहे. त्यामुळे वैजापूर मतदारसंघात शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shivsainik tried convince Ex MLA Vani in vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.