२९ महापालिकांमध्ये निवडणूक झाल्यावर RSSचे ‘व्यापक गृहसंपर्क अभियान’; १८ जानेवारीपासून सुरू
By यदू जोशी | Updated: January 5, 2026 09:05 IST2026-01-05T09:05:07+5:302026-01-05T09:05:07+5:30
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याची भूमिका या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली आहे.

२९ महापालिकांमध्ये निवडणूक झाल्यावर RSSचे ‘व्यापक गृहसंपर्क अभियान’; १८ जानेवारीपासून सुरू
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक अनोखे असे ‘व्यापक गृहसंपर्क अभियान’ हाती घेतले आहे. त्या अंतर्गत हजारो स्वयंसेवक प्रत्येक घरी जाऊन संघकार्याची माहिती देत आहेत. सध्या ग्रामीण आणि अर्धनागरी शहरांमध्ये स्वयंसेवक घरोघरी जात आहेत आणि संघकार्याची महती सांगत आहेत.
संघ स्थापनेमागील उद्देश, संघाच्या कार्याचा विस्तार आज देशभरात कसा झाला आहे, कोणती सेवाकार्ये राबविली जात आहेत, पर्यावरण संरक्षण, याबाबतची माहिती असलेली पत्रके प्रत्येक घरात दिली. सोबतच स्वयंसेवक हे संघाबद्दल व्यक्तिश: माहितीही देत आहेत. मात्र, निवडणूक असलेल्या २९ पालिकांच्या शहरांमध्ये हे अभियान १८ जानेवारीपासून राबविले जाणार आहे. निवडणुकीच्या राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याची भूमिका या निमित्ताने संघाने घेतली आहे.
पालिकांच्या शहरांमध्येही अभियान राबविले असते तर यानिमित्ताने संघाकडून भाजपचा प्रचार केला जात असल्याची टीका झाली असती. संघाने या आरोपापासून स्वत:ला दूर ठेवले. संघाचे अनेक स्वयंसेवक हे भाजपचेही कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर अभियानाची जबाबदारी दिली असती तर त्याला अधिकच राजकीय रंग आला असता, ते संघाने टाळले आहे.