महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 06:17 IST2026-01-02T06:15:41+5:302026-01-02T06:17:21+5:30
मुंबई, संभाजीनगर, कोल्हापूरसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये बंडखोर उमेदवारांना भाव, निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी बंडखोर उमेदवारांवर नेत्यांकडून आश्वासनांची खैरात

महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या नाट्याचा पहिला अंक रंगला बंडखोरीमुळे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत झालेला राडा, हाणामाऱ्या, रडारड यानंतर आता बंडखोरांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षांतील नेत्यांनी ‘मिशन थंडखोरी’ सुरू केले आहे.
अनेक ठिकाणी स्थानिक आमदार व खासदारांवर यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. बंडखोरांना फोन करून, त्यांच्या घरी जाऊन आणि वेळप्रसंगी आश्वासनांची खैरात वाटून बंडखोरी थांबवण्याच प्रय्तन केला जात आहे. सर्वच पक्षातील निष्ठावंत आता 'आमचे काय चुकले?' असा सवाल करत आहेत.
राज्यात सर्वाधिक बंडखोरी झालेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपच्या बंडखोरांची संख्या अधिक आहे. त्यांनी माघार घेऊन भाजपच्या उमेदवारांसाठी काम करावे यासाठी नेत्यांची तीन पथके पक्षाने स्थापन केली आहेत. नेत्यांनी गुरूवारी सकाळपासून बंडखोरांची मनधरणी सुरू केली, मात्र कुणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. शुक्रवार हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. किती बंडखोरांना शांत करण्यात भाजपच्या टीमला यश येते ते स्पष्ट होईल.
महापालिका निवडणुकीत ज्यांच्यामध्ये जिंकण्याची क्षमता आहे, अशा उमेदवारांना मेरिटच्या आधारावर भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काही नाराजांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी ते उमेदवारी मागे घेतील. नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल,
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
ट्रोलिंगनंतर ढसाढसा रडत भाजपच्या पूजा मोरेंची माघार
पुणे महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवार पूजा धनंजय जाधव-मोरे यांनी अखेर उमेदवारी मागे घेतली. पूजा मोरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ट्रोल केल्याने भाजप नेत्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. माघारीनंतर त्यांना भावना अनावर झाल्या.
बंडखाेरांची अट : पक्षश्रेष्ठी सांगतील तरच माघार घेणार
मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत काही इच्छुकांची भेट घेतली आणि त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका इच्छुकाने तर पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यावरच माघार घेईन, असे स्पष्ट केले. शिंदेसेनेतही काही वरिष्ठ नेते बंडखोरांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धवसेनेत वरिष्ठ नेते बंडखोरांनी माघार घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मनसेतही काही बंडखोर आहेत.
ठाण्यातील भाजपच्या नाराजांना शांत करण्याची जबाबदारी आ. संजय केळकर यांच्यावर सोपवली आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील युतीमुळे उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. काही माघार न घेण्यावर ठाम आहेत.
ठाण्यात बिनविरोध निवडीचा नवा फंडा
ठाणे : काही ठिकाणी बंडखोरांना माघार घ्यायला लावून त्या प्रभागाची निवडणूक बिनविरोध करण्याचा नवा फंडा यावेळी प्रकर्षाने जाणवला. काही बंडखोर निवडणुकीचे रिंगण सोडण्याकरिता मांडवलीस तयार आहेत.
अर्ज मागे घेण्यासाठी धमक्या, दानवेंचा आरोप
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उद्धवसेनेच्या उमेदवारांना माघारीसाठी जिल्ह्यातील मंत्री धमकावत असल्याचा थेट आरोप उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला.
मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क
मुंबई : मी कुठे चुकले? जीव तोडून काम केल्यामुळे प्रश्न विचारण्याचा मला हक्क आहे, अशा शब्दांत भाजपमधील इच्छुक महिलेने खदखद व्यक्त केली. दहिसर प्रभाग २ मधून तेजस्वी घोसाळकरांना तिकीट दिल्याने इच्छुक महिलांनी संताप व्यक्त केला.
सांगली : अर्ज मागे घ्या, भविष्यात तुम्हाला संधी देऊ
भाजपच्या नेत्यांनी नाराजी दूर करण्याची मोहीम उघडली असून नाराज व बंडखोरांच्या घरापर्यंत जाऊन समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेत्यांनी दिवसभरात ६३ नाराजांची भेट घेत भविष्यात संधी देण्याची ग्वाहीही दिली.