ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:25 IST2026-01-14T15:25:02+5:302026-01-14T15:25:37+5:30
What Is Printing Auxiliary Display Unit And How Work PADU: राज्यभरातील मनपा निवडणुकीसाठी आता निवडणूक आयोगाने एक PADU नावाचे नवीन मशीन आणले आहे.

ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
What Is Printing Auxiliary Display Unit Machine: राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. राज्यभरात निवडणूक साहित्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. मतदान केंद्रांपर्यंत EVM मशीन आणि अन्य साहित्य पोहोचवले जात आहे. अशातच निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचे नवीन मशीन आणले आहे. अचानक हे यंत्र आणल्यावर ठाकरे बंधूंनी यावर आक्षेप नोंदवला. पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. परंतु, PADU नेमके कसे आणि काय काम करते? याविषयी जाणून घेऊया...
पाडू मशीन सगळीकडे ठेवले जाणार आहे. व्हीव्हीपॅट बंद पडले, तर हे मशीन वापरले जाणार आहे. पण, याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिलेली नाही. ईव्हीएमला नवीन मशीन जोडण्यासंबंधी आधी माहिती का दिली नाही? नवीन मशीन राजकारण्यांना दाखवावेसे आयोगाला वाटले नाही. काय प्रकारचे राजकारण सुरू आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावर मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी महत्त्वाचा खुलासा केला.
मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी नेमके काय म्हणाले?
पाडू मशीन मुंबईमध्ये सरसकट वापरले जाणार नाही. काही अपवादात्मक, आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास हे मशीन वापरले जाईल. व्हीव्हीपॅटला पर्याय म्हणून गरज पडल्यावर हे मशीन वापरले जाणार आहे. यावेळी जी मतमोजणी होईल, ती कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांना सोबत जोडून करण्याचे आदेश आहेत. जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काम करत नसेल, तर हे (पाडू) एक यंत्र आहे. हे पण कंट्रोल युनिटच आहे. तसेच आहे. ते बॅकअप म्हणजे पर्याय असणार आहे, अशी माहिती गगराणी यांनी दिली.
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU नेमके कसे आणि काय काम करते?
- Printing Auxiliary Display Unit म्हणजेच PADU हे एक कंट्रोल युनिट आहे.
- व्हीव्हीपॅटला पर्याय म्हणून गरज पडल्यावर हे मशीन वापरले जाणार आहे.
- बेल नावाच्या कंपनीने हे मशीन बनवले आहे.
- पाडू हे व्हीव्हीपॅटसारखं पेपर पावती देणारे यंत्र नाही.
- मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
- हे यंत्र ईव्हीएमला जोडण्यात येईल. कंट्रोल युनिट म्हणून हे यंत्र वापरले जाईल.
- मुंबई महापालिका निवडणुकीत भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीची M3A हे मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत.
- या यंत्राद्वारे नोंदविलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला पॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे.
- जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल, तर भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या PADU युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला PADU मशीन प्राप्त झालेल्या आहेत.