राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 06:19 IST2026-01-10T06:19:28+5:302026-01-10T06:19:28+5:30
गृह विभागाने राज्य निवडणूक आयोगाला आचारसंहितेच्या काळात दाखल गुन्हे, जप्त करण्यात आलेली दारू, रक्कम आदींबाबतचा अहवाल पाठविला आहे.

राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या १८६ तक्रारी राज्यभरात करण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात ८.३२ कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आले. निवडणुकीशी संबंधित ३८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
गृह विभागाने राज्य निवडणूक आयोगाला आचारसंहितेच्या काळात दाखल गुन्हे, जप्त करण्यात आलेली दारू, रक्कम आदींबाबतचा अहवाल पाठविला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
देशीविदेशी दारूचे अवैध साठे जप्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यात १ लाख ८७४१५ लीटर दारू जप्त करण्यात आली. तिची किंमत ५ कोटी ९५ लाख रुपये इतकी आहे. याच काळात ४८ कोटी १५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. आचारसंहिता काळात जप्त केलेल्या एकूण अवैध शस्त्रास्त्रे व स्फोटकांची संख्या ६३२ इतकी आहे. त्यात ७४ पिस्तूल आणि ५५८ धारदार शस्त्रांचा समावेश आहे. निवडणुकीशी संबंधित ३८ गुन्हे नोंदविण्यात आले.
मनिट्रेलवर नजर
निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात पैसा वाटला जातो. हा पैसा कुठून येतो आहे आणि त्याचा कसा वापर केला जात आहे, यावर पोलिस दलाने करडी नजर ठेवली असून विविध ठिकाणी रकमाही जप्त केल्या आहेत. राजकीय नेते वा त्यांच्याशी संबंधित कंत्राटदारांच्या बँक खात्यातून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात रकमा काढल्या जात आहेत का, काढल्या जात असतील तर हा पैसा नेमका कुठे जात आहे याचीही गुप्तपणे माहिती घेतली जात आहे.