Municipal Election 2026: तुम्ही आम्हाला वेडे समजता का...? एकाच वेळी दोन-दोन पक्षात काम करणारे कार्यकर्ते अन् मतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:56 IST2026-01-08T09:56:44+5:302026-01-08T09:56:44+5:30
Maharashtra Municipal Election 2026: कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणत्या पक्षाचा प्रचार करत आहे, आणि कोण कोणाच्या विरोधात बोलत आहे? याचा कसलाही ताळमेळ या निवडणुकीत लागत नाही.

Municipal Election 2026: तुम्ही आम्हाला वेडे समजता का...? एकाच वेळी दोन-दोन पक्षात काम करणारे कार्यकर्ते अन् मतदार
कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणत्या पक्षाचा प्रचार करत आहे, आणि कोण कोणाच्या विरोधात बोलत आहे? याचा कसलाही ताळमेळ या निवडणुकीत लागत नाही. मुंबईतल्या एका सोसायटीत प्रचाराचे पत्रक देण्यासाठी सकाळी काही कार्यकर्ते आले. त्यांनी भाजप उमेदवाराचे पत्रक सोसायटीत वाटले. संध्याकाळी तेच कार्यकर्ते दोन बिल्डिंगपलीकडच्या सोसायटीत आले. त्यावेळी त्यांनी शिंदेसेनेच्या उमेदवारांची पत्रके सोसायटीत दिली.
तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने आहात? सकाळी एकाचे काम, संध्याकाळी दुसऱ्याचे काम, हा काय प्रकार आहे? दोन्ही ठिकाणी पत्रके स्वीकारणाऱ्या व्यक्तीने त्यांना हा सवाल केला. तेव्हा त्यांचे उत्तर मजेशीर होते. काका, हेच तर दिवस आहेत कमाई करण्याचे..! सकाळी त्यांनी पैसे दिले म्हणून त्यांची पत्रके वाटली. संध्याकाळी यांनी पैसे दिले म्हणून यांची पत्रके वाटली..!
निवडणुका झाल्या की आम्हाला कोण विचारणार? आता पैसे देतात. जेवण्या-खाण्याची सोय करतात. तुम्ही पत्रक ठेवून घ्या. मत तुम्हाला ज्याला द्यायचे त्याला द्या, असे सांगायलाही ते कार्यकर्ते विसरले नाहीत..! तुम्ही आम्हाला वेडे समजता का? असे विचारल्यानंतर उत्तर न देता हसत हसत ते कार्यकर्ते पुढच्या बिल्डिंगमध्ये निघून गेले.