व्हिडिओ: 'वर्क ऑर्डर' विचारताच आमदार भूमरेंची गावकऱ्यांना दमदाटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 18:56 IST2019-09-09T12:24:42+5:302019-09-09T18:56:24+5:30
आमदार भुमरे हे म्हारोळा गावात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन करण्यासाठी गावात गेले असता, त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

व्हिडिओ: 'वर्क ऑर्डर' विचारताच आमदार भूमरेंची गावकऱ्यांना दमदाटी
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यासाठी काही दिवसांचा काळ शिल्लक असताना लोकप्रतिनिधीनी विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाकाच लावला आहे. मात्र कुठलेही टेंडर आणि 'वर्क ऑर्डर' नसताना, फक्त आचारसंहिता पूर्वी उद्घाटन करणारे पैठणचेशिवसेना आमदार संदीपान भूमरेंना गावकऱ्यांनी विरोध केला. तर गावकऱ्यांनी विरोध केला म्हणून भुमरे चांगलेच संतापले. तुमचे माझ्यावर काही उपकार नाहीत. यापुढे तुमच्या गावाचा रस्ता कोण करतो पाहतोच मी, असे म्हणत गावकऱ्यांना दमदाटी केली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून,त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका होताना पाहायला मिळत आहे.
रविवारी आमदार भुमरे हे म्हारोळा गावात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन करण्यासाठी गावात गेले असता, त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गेली पाच वर्षे तुम्ही कुठे होता, आता आचारसंहिता लागणार असल्याने उद्घाटन करत आहात. मात्र ज्या रस्त्याचे तुम्ही उद्घाटन करत आहेत, त्याचा टेंडर निघाला नाही. त्याचबरोबर कोणतेही 'वर्क ऑर्डर' नाही. त्यामुळे पुढे हा रस्ता होईल का असे प्रश्न गावकऱ्यांनी विचाराताच आमदार भुमरे चांगलेच संतापले.
मी आतापर्यंत २०० गावात विकासकामांचे उद्घाटन केली असतील, पण अजूनही कुणी मला 'वर्क ऑर्डर' विचारली नाही. मग तुम्ही कसे विचारतात, तुमचे माझ्यावर काही उपकार नाहीत. त्यामुळे आता तुमच्या गावातील रस्ता कोण बनवतो पाहतोच मी, असे म्हणत गावकऱ्यांना रागवत दमदाटी केली. हा सर्व प्रकार कैमरेत कैद झाला असून, भूमरेंचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत आमदार भुमरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांची प्रतिकिया मिळू शकली नाही.