महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:49 IST2026-01-02T19:29:16+5:302026-01-02T19:49:29+5:30
Marathi Sahitya Sammelan: सध्या सुरू असलेल्या महानरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठीचा मुद्दा तापला आहे. त्यात मुंबईसारख्या प्रमुख महानगरपालिकेमध्ये उद्धव आणि राज ठाकरें यांनी मराठीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून स्पष्ट संदेश दिला आहे.

महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश
सध्या सुरू असलेल्या महानरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठीचा मुद्दा तापला आहे. त्यात मुंबईसारख्या प्रमुख महानगरपालिकेमध्ये उद्धव आणि राज ठाकरें यांनी मराठीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून स्पष्ट संदेश दिला आहे. अभिजात मराठीला राजमान्यता मिळाली आहे. आता लोकमान्यता मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाच सक्तीची राहणार आहे. अन्य कुठल्याही भाषेची सक्ती केली जाणारा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
काही महिन्यांपूर्वी नव्या शिक्षण धोरणामुळे राबवण्यात येणारे त्रिभाषा सूत्र आणि पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा घेण्यात आलेला निर्णय यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आज मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी भाषेबाबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, साहित्य संमेलनाच्या उदघाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरंतर भाषा सक्तीची कुठली असा एक मुद्दा सातत्याने समोर येतोय. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो की, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी भाषाच सक्तीची आहे. इतर कुठलीली भाषा सक्तीची नाही. फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.
साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. मराठी भाषेला केवळ अभिजात भाषा जाहीर करून आपल्याला थांबता येणार नाही. ही बाब खरी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेसाठी मराठीजनांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष समजून घेतला आणि जी मराठी भाषा अभिजात भाषा होतीच तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला याचा आनंद आहे. मराठीला राजमान्यतेची आवश्यकता होती ती मिळाल्याने एक काम झालं आहे. आता या राजमान्यतेचा उपयोग करून आपल्याला मराठी भाषेला संपूर्ण भारतामध्ये लोकमान्यता मिळवून द्यायची आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात मराठी अध्यासन सुरू करण्याची मला संधी मिळाली. तिथे या अध्यासनाचं जे स्वागत झालं ते पाहून मला अतिशय आनंद झाला, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.