दमदार विजयानंतरदेखील भाजपचा ‘दक्ष’ पवित्रा, राष्ट्रीय सरचिटणीसांनी घेतला आढावा
By योगेश पांडे | Updated: December 16, 2024 23:48 IST2024-12-16T23:48:13+5:302024-12-16T23:48:42+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत बंपर विजयानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात नियोजनाला सुरुवात झाली असून, विधानसभेच्या विजयानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते ‘रिलॅक्स’ होऊ नयेत याची खबरदारी घेण्यात येत आहे.

दमदार विजयानंतरदेखील भाजपचा ‘दक्ष’ पवित्रा, राष्ट्रीय सरचिटणीसांनी घेतला आढावा
- योगेश पांडे
नागपूर - विधानसभा निवडणुकीत बंपर विजयानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात नियोजनाला सुरुवात झाली असून, विधानसभेच्या विजयानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते ‘रिलॅक्स’ होऊ नयेत याची खबरदारी घेण्यात येत आहे. राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष व सहसंघठनमंत्री शिवप्रकाश यांनी भाजपच्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी निकालांतील एकूण कामगिरीचा आढावा घेतला व महायुतीचा धर्म न पाळता मित्रपक्षांसाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कठोर शब्दांत कान टोचले.
विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे राजकारण आणि तेथील मुद्दे वेगळे राहणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांचा तळागाळात ‘कनेक्ट’ कायम असणे आवश्यक आहे. जी चूक २०२४च्या लोकसभा निवडणुकीअगोदर झाली ती परत होऊ नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गतच बी. एल. संतोष व शिवप्रकाश यांनी नागपुरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष, महामंत्री व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या शहर कार्यालयात झालेल्या या बैठकीत दोन्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय निकालातील जमेच्या बाजू व कच्चे दुवे अगोदर पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी जेथे भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला किंवा अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळू शकले नाही, अशा जागांचे गणित जाणून घेतले, तर सर्वात शेवटी महायुतीच्या इतर मित्रपक्षांचे उमेदवार उभे असलेल्या मतदारसंघांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे विश्लेषण केले. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मतदारयादीपासून पक्षाच्या सर्व उपक्रमांसाठी परत नव्या जोमाने कामाला लागण्याची सूचना केली. तसेच तळागाळात फिरून जनतेच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत व खरोखर योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्याचे निर्देशच दिले.
काम का केले नाही ते सांगा?
बैठकीदरम्यान काही जिल्हाध्यक्ष व महामंत्र्यांनी थातूरमातून कारणे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बी. एल. संतोष व शिवप्रकाश हे दोघेही प्रत्येक मतदारसंघाचा विस्तृत अहवालच सोबत घेऊन आले होते. निवडणूक लढण्याअगोदर तिकिटासाठी अनेक जण प्रयत्नरत होते. मात्र संबंधित जागा मित्रपक्षांना गेल्यावर किंवा वेगळा उमेदवार दिल्यावर त्याच जोमाने काम का केले नाही या शब्दांतच काही जणांना विचारणा केली. जेथे पराभव झाला तेथे महायुतीसाठी काम का केले नाही हा प्रश्न विचारताना त्यांनी तेथील मतांची बेरीज वजाबाकीदेखील मांडली.