Lok Sabha Election 2019 : राज्यातील हवा बदलतेय, विधानसभेला राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:24 AM2019-04-13T11:24:10+5:302019-04-13T12:11:27+5:30

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल चित्र दिसत आहे. आपण अनेक निवडणूका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते.

Lok Sabha Election 2019 The political situation in Maharashtra is changing: Sharad Pawar | Lok Sabha Election 2019 : राज्यातील हवा बदलतेय, विधानसभेला राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते - शरद पवार

Lok Sabha Election 2019 : राज्यातील हवा बदलतेय, विधानसभेला राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते - शरद पवार

Next
ठळक मुद्देजम्मू-काश्मीर हे संवेदनशील राज्य असल्याने कोणताही निर्णय संयमाने व लोकांचे हित पाहूनच घ्यावा लागतोआश्वासने नरेंद्र मोदी सरकारने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल चित्र दिसत आहे. आपण अनेक निवडणुका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते, यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

शरद पवार म्हणाले, मागील निवडणूकीत दिलेली आश्वासने नरेंद्र मोदी सरकारने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळे रोज एक प्रचाराचे मुद्दे बाहेर काढत आहेत. व्यक्तीगत हल्ले करून त्यातून प्रतिसाद मिळत नसल्याने आता त्यांनी काश्मीरमध्ये काँग्रेस फुटीरवाद्यांसमवेत गेल्याची टीका करत आहेत. त्यांच्या टीकेचा रोक जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे आहे, पण ते आमचे घटकपक्षच नाहीत.

उलट भाजपाच त्यांच्यासमवेत सरकारमध्ये होते. तीन-चार वर्षापुर्वी मोदी यांनी काश्मीरच्या विकासाचा चांगला कार्यक्रम मांडल्याने त्याचे स्वागत केले. पण त्यातील एकाही गोष्टीची अंमलबजावणी झाली नसल्याने येथील तरूण पिढी संतप्त आहे. जम्मू-काश्मीर हे संवेदनशील राज्य असल्याने कोणताही निर्णय संयमाने व लोकांचे हित पाहूनच घ्यावा लागतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची टीका गांभीर्याने घेण्यासारखी नसते.

वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय माहिती नाही, त्यामुळे त्याचा फटका कोणला बसेल हे आताच सांगता येणार नाही. पण जाणीवपुर्वक मतविभागणी करण्यासाठी काही मंडळींनी केलेला हा कार्यक्रम असू शकतो. असेही पवार यांनी सांगितले.

भीतीपोटीच पर्रीकरांनी संरक्षणमंत्री पद सोडले

‘राफेल’ विमान खरेदीमध्ये भाजपा सरकारने तीन दर सांगितले. या व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी धरली. यामध्ये नेमके काय गौडबंगाल झाले, याची कल्पना दिवगंत मनोहर पर्रीकरांना होती. त्यामुळेच देशाचे अतिशय महत्त्वाचे असलेले संरक्षण मंत्री पद सोडून ते गोव्यासारख्या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे पवार यांनी सांगितले.

‘मोदी-शहा’ हटाव हाच ‘राज’ यांचा एककलमी कार्यक्रम

‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटविण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत, विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असेही पवार यांनी सांगितले.

‘ध्यानात काय ठेवले’ हे लवकरच कळेल

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ या टॅगलाईन खाली शिवसेनेचा प्रचार सुरू केला आहे. त्यावर पेठवडगावच्या सभेत ‘ त्यांचे ठरलंय तर आम्ही पण ध्यानात धरलंय’ असा सूचक इशारा पवार यांनी दिला होता. त्याबाबत पुन्हा विचारणा केली असता, ‘मी महाराष्ट्रभर फिरतो त्यामुळे कोण काय काय म्हणतो ते सगळे ध्यायात ठेवतो. त्यामुळे ध्यानात काय ठेवले हे तुम्हाला लवकरच कळेल. असे पवार यांनी सांगितले.

जनतादल आमच्या सोबत

जनतदलाची आमची आघाडी असून या पक्षाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा हे आमच्यासोबत सक्रीय आहेत. त्यामुळे कोल्हापूरात ते आमच्या सोबत राहतील, असे शरद पवार यांनी श्रीपतराव शिंदे यांच्या भूमिकेवर स्पष्ट केले.
 

Web Title: Lok Sabha Election 2019 The political situation in Maharashtra is changing: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.