Kasba ByPoll Result : “जसे मविआ सरकार पाडले, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब केली; त्याचा जनतेकडून निषेध”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 14:37 IST2023-03-02T14:37:02+5:302023-03-02T14:37:36+5:30
कसब्यातील विजयानंतर शिंदे-फडणवीसांवर जयंत पाटील यांचा हल्लाबोल

Kasba ByPoll Result : “जसे मविआ सरकार पाडले, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब केली; त्याचा जनतेकडून निषेध”
“ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचाच उमेदवार कसबा निवडणुकीत विजयी होत होता याची आठवण करून देतानाच चिंचवड पोटनिवडणूक आमचा भलेही पराभव झाला असला तरी विरोधात पडलेली मते एकत्र केली असती तर भाजपचा तिथेही पराभव झाला असता असेही जयंत पाटील म्हणाले. फडणवीस - शिंदे यांची जी युती झाली आहे त्याबाबत राज्यातील जनता प्रचंड नाराज आहे हे कसबा निवडणुकीतून समोर आल्याचेही ते म्हणाले.
धंगेकर यांचा विजय
महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अनपेक्षित विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. कसबा विधानसभा मतदारसंघात मुक्ता टिळक हा आमदार होत्या. त्यांचे काही दिवसांपूर्वी कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. त्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यात भाजपाच्या पदरी अखेर निराशा आली. गेली ३० वर्षे या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व होते, पण यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला. यापूर्वी १९९१ पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळाला होता. रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत.