Gondia district did not get a ministerr | मंत्रिमंडळ विस्तारात गोंदिया जिल्ह्याची पाटी कोरीच; पुन्हा बाहेरचाच पालकमंत्री

मंत्रिमंडळ विस्तारात गोंदिया जिल्ह्याची पाटी कोरीच; पुन्हा बाहेरचाच पालकमंत्री

गोंदिया: महाविकास आघाडी सरकारचा लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. यात एकूण ४३ मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र मंत्रीमंडळ विस्तारात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही.मंत्रीमंडळ विस्तारात गोंदिया जिल्ह्याची पाटी कोरीच असल्याने जिल्हावासीयांमध्ये नाराजीचा सुरू ऐकायला मिळाला.

तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे तत्कालीन आमदार राजकुमार बडोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर बडोले यांच्या रूपाने जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला होता. त्यानंतर या सरकारचा सहा महिन्याचा कार्यकाळ शिल्लक असताना बडोले यांचे मंत्रीपद गेले. त्यामुळे भंडारा-गोंदिया विधान परिषद क्षेत्राचे आ. डॉ. परिणय फुके यांच्यावर पालकमंत्री पदाची जवाबदारी सोपविण्यात आली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. मनोहर चंद्रिकापुरे, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातून सहषराम कोरोटे, गोंदिया विधानसभा क्षेत्रातून अपक्ष विनोद अग्रवाल आणि तिरोडा विधानसभा क्षेत्रातून भाजपचे विजय रहांगडाले निवडून आले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार कडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पण सोमवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून कुणाचीच मंत्रीमंडळात वर्णी लागली नाही. परिणामी मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्याची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे जिल्ह्यावासीयांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्ह्यातील एकाही आमदाराची मंत्रीमंडळात वर्णी न लागल्याने जिल्ह्याला पुन्हा बाहेरचाच पालकमंत्री मिळणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील जेष्ठ नेते यावर कुठला तोडगा काढून ही नाराजी दूर करतात याकडे लक्ष लागले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gondia district did not get a ministerr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.