काँग्रेसमुळं लोकांचे केस गेले, फिल्टरच्या पाण्यामुळे मी वाचलो; पाणीपुरवठा मंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 13:18 IST2019-08-30T12:26:02+5:302019-08-30T13:18:04+5:30
कचरा करणारं काँग्रेस हवं की, फिल्टरचं पाणी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवेत, हे जनतेनं ठरवायंच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यायचा आहे, असंही लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

काँग्रेसमुळं लोकांचे केस गेले, फिल्टरच्या पाण्यामुळे मी वाचलो; पाणीपुरवठा मंत्र्यांचा दावा
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जात असून चांगलीच गाजत आहे. परंतु, आता ही यात्रा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या अजब दाव्यामुळे चर्चेत आली आहे.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आयोजित जाहीर सभेत लोणीकर यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, पुर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठवाड्याला नदीचं, ओढ्या, डबक्याचं, दुषित बोरच पाणी पाजलं. आमच्या मराठवाड्याला आधीच्या सरकारने शाहू, फुले, आंबेडकरांच नाव सांगितले. परंतु, आम्हाला केवळ दुषित पाणीपुरवठा केला. या दुषित पाणीपुरवठ्यामुळे गरिब लोकांच्या किडनी खराब झाल्या, लिव्हर, वॉल्व्हस खराब झाले. याच पाण्यामुळे येथे उपस्थित अर्ध्या लोकांच्या डोक्यावरचे केस गेले. याला राष्ट्रवादी-काँग्रेसच जबाबदार आहे. मात्र फिल्टरच्या पाण्याने केस धुतल्यामुळे मी वाचलो असून माझे केस सुरक्षीत असल्याचा अजब दावा लोणीकर यांनी केला.
दरम्यान कचरा करणारं काँग्रेस हवं की, फिल्टरचं पाणी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवेत, हे जनतेनं ठरवायंच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यायचा आहे, असंही लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.