"देवेंद्रजी, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका"; ठाकरेंच्या आमदाराची फडणवीसांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 09:57 IST2024-12-07T09:54:58+5:302024-12-07T09:57:34+5:30

सोयाबीन खरेदी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी टीका केली.

"Devendraji, don't bring the Gujarat pattern of Jumlebaazi to Maharashtra"; Thackeray's MLA criticizes Fadnavis | "देवेंद्रजी, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका"; ठाकरेंच्या आमदाराची फडणवीसांवर टीका

"देवेंद्रजी, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका"; ठाकरेंच्या आमदाराची फडणवीसांवर टीका

Devendra Fadnavis News: १५ टक्के आर्द्रता असलेल्या सोयाबीनचीही हमीभावाने खरेदी केली जात असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला. त्यांचा हा दावा फेटाळून लावत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी टीका केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीबद्दल दिलेल्या माहितीचा व्हिडीओ शेअर करत कैलास पाटील यांनी निशाणा साधला आहे. 

कैलास पाटील फडणवीसांना काय म्हणाले?

"सन्माननीय देवेंद्रजी, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात याबद्दल प्रथमत: आपले मनःपूर्वक अभिनंदन! मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना लागून आहे. मात्र, आपणही पुन्हा तोच कित्ता गिरवत आहात, असे दिसते", अशी टीका कैलास पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.  

"आपण आजच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोयाबीन खरेदीचा मुद्दा सांगितला. आर्द्रतेचा निकष १२ टक्के होता. तो शेतकरी हित लक्षात घेऊन वाढवला व १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेत आहात व त्यामुळे विक्रमी खरेदी झाल्याचे आपण म्हटले आहे. पण, त्याची एकदा पडताळणी करायला हवी होती. केंद्रावरील वास्तव आपण म्हणता त्यापेक्षा वेगळे आहे", असे कैलास पाटील यांनी फडणवीसांच्या दाव्यावर बोलताना म्हटले आहे. 

वास्तव पहा आणि मगच बोला -कैलास पाटील

"धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील एकाही हमीभाव केंद्रावरून १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीन खरेदी केले गेले नाही, आजही करीत नाहीत. आपण स्वतः काही केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. त्यामुळे हे वास्तव आपणास अवगत करून देणे आवश्यक वाटते. नव्या सरकारची सुरुवातच अशा थापानी होणार असेल तर पुढे शेतकऱ्यांनी आपल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला...", अशी टीका कैलास पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे.  

"शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, ही आपणास विनंती...", असे आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे. 

१२ टक्के आर्द्रता असलेल्या सोयाबीनची खरेदी करता येते. पण, यावेळी सोयाबीनमध्ये जास्त आर्द्रता असल्याने आम्ही केंद्र सरकारला खरेदी करण्याची परवानगी मागितली होती. आणि १५ टक्के आर्द्रता असलेल्या सोयाबीनची खरेदी केली जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.  

Web Title: "Devendraji, don't bring the Gujarat pattern of Jumlebaazi to Maharashtra"; Thackeray's MLA criticizes Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.