शरद पवारांच्या राजकारणाशी तुलना; देवेंद्र फडणवीसांनी सविस्तरपणे मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 19:25 IST2024-12-25T19:24:28+5:302024-12-25T19:25:00+5:30
मी राजकारणीच नाही, सत्ता माझ्या डोक्यात जात नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या राजकारणाशी तुलना; देवेंद्र फडणवीसांनी सविस्तरपणे मांडली भूमिका
CM Devendra Fadnavis ( Marathi News ) : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांची वारंवार तुलना होत असते. मागील काही वर्षांत या दोन नेत्यांमध्ये अनेकदा शह-काटशहाचं राजकारणही रंगलं. शरद पवार यांनी चारवेळा राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. फडणवीस यांच्याकडेही आता तिसऱ्यांदा ही जबाबदारी आली आहे. नागपूर इथं आज झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांच्याशी होत असलेल्या तुलनेबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "दोघांची राजकारण करण्याची आपआपली वेगळी शैली आहे. मुळात मी राजकारणीच नाही. मला शह-काटशहाचं राजकारण करता येत नाही. मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो. माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सकारात्मकता आहे. अनेकदा त्यामध्ये अडथळते येतात, पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं. पहिल्यांदा मुख्यमंत्री होणं आणि आता पुन्हा मुख्यमंत्री होणं यातून आपल्याला शिकायला मिळतं आणि आपण शहाणे होत जातो. चुका लक्षात येतात. जो काम करेन, जो निर्णय घेईन तो चुकत असतो. मी या मताचा आहे की, निर्णय घेतले पाहिजेत आणि चुका झाल्या तर त्या सुधारल्या पाहिजेत. आपण चूक केली तर ती मान्य करून तो निर्णय मागेही घेतला पाहिजे. अनेकदा मी असेल निर्णय मागे घेतले आहेत," असं भाष्य फडणवीस यांनी केलं आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, "राजकारणात सर्व स्तराला जाऊन लोक आव्हान निर्माण करत असतात. मात्र मागील १० वर्षांच्या काळात आपल्या लक्षात आलं असेल की, कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी मी धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना करतो. सत्ता ही कधीही माझ्या डोक्यात जात नाही. कारण ज्या विचाराने मी राजकारणात आलो आहे, त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे, हेच मला शिकवलं आहे. त्यामुळे पुढेही सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही, असा विश्वास मी आपणास देतो."
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रिपद स्वीकारावं, अशी इच्छा भाजप आमदार सुरेश धस यांनी बोलून दाखवली आहे. यावरही फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. "पालकमंत्रिपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला पाठवले तरी मी बीडला जाईन. पण माझ्या मते साधारणपणे मुख्यमंत्री स्वत:कडे कोणते पालकमंत्रिपद ठेवत नाहीत. असे असले तरी माझी इच्छा अशी आहे की, गडचिरोलीचे पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवावे. त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी असेल तर ते होईल. अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.