प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना आजपासून एबी फॉर्मचे वाटप; उमेदवारांची होणार दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:01 IST2025-12-29T15:58:49+5:302025-12-29T16:01:52+5:30
युती आणि आघाडीच्या चर्चेमुळे तसेच बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर करण्याचे ठरवले होते. त्यामुळे निश्चित केलेल्या उमेदवारांच्या यादीही सोमवारी आणि मंगळवारी टप्प्याटप्प्याने जाहीर होतील.

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना आजपासून एबी फॉर्मचे वाटप; उमेदवारांची होणार दमछाक
दीपक भातुसे -
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय पक्षांतील आघाडी आणि युतीच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आघाडी आणि युतीत ज्या जागांवर सहमती झाली आहे, अशा जागांसाठी ए आणि बी फॉर्म वितरित करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. उमेदवारांच्या हातात आता सोमवार आणि मंगळवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने त्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी दमछाक होणार आहे.
युती आणि आघाडीच्या चर्चेमुळे तसेच बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर करण्याचे ठरवले होते. त्यामुळे निश्चित केलेल्या उमेदवारांच्या यादीही सोमवारी आणि मंगळवारी टप्प्याटप्प्याने जाहीर होतील.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपत आहे.
अर्ज भरायला तयार राहा, उमेदवारांना गेले फोन
उद्धवसेना आणि मनसेने उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केल्याचे समजते. या दोन्ही पक्षांची यादीही सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचीही मुंबईतील उमेदवारांची
यादी तयार असून, तीही सोमवारी जाहीर केली जाणार असली, तरी काही उमेदवारांना फोनवरून अर्ज भरण्यास तयार राहायला सांगितले असल्याचे समजते. दरम्यान, आपने तिसरी यादी रविवारी जाहीर केली आहे.