546 crore medical assistance in five years by CM office | ऐतिहासिक... मुख्यमंत्री फडणवीसांचा रुग्णांना आधार, 55 हजार रुग्णांवर उपचार
ऐतिहासिक... मुख्यमंत्री फडणवीसांचा रुग्णांना आधार, 55 हजार रुग्णांवर उपचार

नागपूर : महागड्या वैद्यकीय उपचारामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना उपचार करणे कठीण झाले आहे. यातच एखाद्याला दुर्धर आजार झाला तर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. परंतु अशांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्ष धावून येतो. या कक्षाद्वारे गेल्या पाच वर्षांत राज्यातील सुमारे ५५,६०८ रुग्णांना याचा लाभ मिळाला असून, त्यांच्यावर ५४६ कोटी ४६ लाख ३ हजार २८३ रुपये विविध आजारांसाठी खर्च करण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासात वैद्यकीय उपचारासाठी इतकी मोठी मदत आजवर कधीही मिळालेली नाही. सन २००९ ते २०१४ या कालावधीत एकूण ४० कोटी ५६ लाख ९४ हजार ७०० रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला, अशी माहिती शासकीय लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.

जोशी म्हणाले, राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना दुर्धर आजारावर नमांकित रुग्णालयांमध्ये उपचार करण्याकरिता मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाद्वारे आर्थिक साहाय्य अदा करण्यात येते. पूर्वी विदर्भातील रुग्णांना आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालयात जावे लागत होते. त्याकरिता रुग्णांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागत असे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत, नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस येथे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्ष कार्यान्वित करून, या कार्यालयाची धुरा विशेष कार्य अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे यांच्याकडे सोपविली.

नागपूर येथे वैद्यकीय साहाय्यता निधी कक्ष स्थापित झाल्यापासून विदर्भामधील रुग्णांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या कक्षाचे काम २०१७ पासून सुरू झाले. एकट्या विदर्भातच ५ जानेवारी २०१७ ते ७ ऑक्टोबर २०१९ या तीन वर्षात हृदयरोग, कॅन्सर व मेंदूच्या आजारावरील एकूण ६,४०२ रुग्णांना ५० कोटी ३२ लाख ५ हजार ५०० रुपये निधी वितरीत केला.

या केंद्राद्वारे केवळ आलेल्या गरजूंनाच मदत केली असे नाही, तर विशेष शिबिर आयोजित करूनही मदत पोहोचविण्यात आली. उदाहरणार्थ नागपूर शहरातील शाळांमधील वाहन चालकांकरिता नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून ५२५ गरजूंना मोफत चष्मे वितरित करण्यात आले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील मागील कित्येक वर्षांपासून अनुदानाअभावी प्रलंबित असलेले एमआरआय व सिटी स्कॅन यंत्र खरेदी करण्याकरिता साई शिर्डी संस्थानकडून ३५ कोटी रुपयाचे अनुदान प्राप्त करण्याकरिता संबंधित विभागाशी समन्वय साधून अनुदान प्राप्त करण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.

गैरवापर करणाऱ्यांनाही चपराक

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीमार्फत आवश्यक व गरजूंना मदत केली जाते. परंतु मध्यंतरी काही रुग्णालयांनी याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात आल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्या अशा नागपूर शहरातील १२ नामांकित रुग्णालयांना या योजनेतून वगळण्यात आले असून, त्यांच्याकडून साहाय्यता निधीची रक्कमसुद्धा परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले.


Web Title: 546 crore medical assistance in five years by CM office
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.