लातूरचा 'सहावा' महापौर कोण? आरक्षणाकडे लक्ष, मुंबईतील 'बिग बजेट' उमेदवारांचीही 'एंट्री'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 20:21 IST2025-12-27T20:19:48+5:302025-12-27T20:21:02+5:30
लातूर महानगरपालिका निवडणूक; १३ वर्षांचा प्रवास, पाच महापौर, सहावा कोण? याची उत्सुकता

लातूरचा 'सहावा' महापौर कोण? आरक्षणाकडे लक्ष, मुंबईतील 'बिग बजेट' उमेदवारांचीही 'एंट्री'!
- हणमत गायकवाड
लातूर: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही वेगात सुरू आहे. मात्र, यंदाची निवडणूक एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. परंपरेनुसार निवडणुकीपूर्वी जाहीर होणारे महापौरपदाचे आरक्षण यंदा अद्याप गुलदस्त्यात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चाचर्णव आहे. आरक्षण जाहीर न होताच निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्याने, लातूरचा 'सहावा' महापौर कोण असणार, याचा अंदाज बांधणे मतदारांसाठी कठीण झाले आहे.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गेल्या चार दिवसांत नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत १०८४ हून अधिक अर्ज विक्री झाले आहेत.
इच्छुकांची मोठी फौज मैदानात उतरण्यास सज्ज आहे. यंदा नगरसेवकांची निवडणूक पार पडल्यानंतरच महापौरपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांमधून कोणाची वर्णी लागेल, हे प्रत्यक्ष आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत केवळ 'अंदाज' आणि 'राजकीय खलबत्ते' सुरूच राहणार आहेत.
मुंबईचे उमेदवार...
मूळचे लातूरचे परंतु, मुंबईत वास्तव्य असणारे काही बिगबजेट उमेदवार महापौरपद समोर ठेऊन मैदानात उतरत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना पक्षनेत्यांकडून शब्द मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. पुढच्या दोन दिवसात चित्र अधिक स्पष्ट होईल.
यंदा महापौरपद कोणाला, आरक्षणावर रंगली चर्चा...
राजकीय गोटात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे आगामी महापौरपदाचे आरक्षण, आतापर्यंत लातूरमध्ये अनुसूचित जाती पुरूष, महिला आणि ओबीसी महिला प्रवर्गाला महापौरपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे, यंदा हे पद आजवर आरक्षण न मिळालेल्या घटकांना मिळू शकते. याच शक्यतेचा विचार करून अनेक राजकीय पक्षांनी 'सेफ गेम' खेळायला सुरुवात केली आहे. दरम्यान, ज्या प्रवर्गाला महापौरपद सुटेल अशी शक्यता आहे, त्या-त्या प्रवर्गातील उमेदवारांची चाचपणी भाजप, काँग्रेस करत आहे. विशेषतः काही मातब्बर उमेदवारांना उभे करण्यासाठी माजी मंत्री, आमदार यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. दरम्यान, नामनिर्देशनपत्र भरण्याच्या तिसऱ्या दिवशी ८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज आयोगाकडे दाखल केला आहे. तर आतापर्यंत १ हजार ८४ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे.
लातूर महापालिकेतील पाच महापौरांचा कार्यकाळ
लातूर मनपाच्या १३ वर्षांच्या इतिहासात शहराने आतापर्यंत पाच महापौर पाहिले आहेत. यामध्ये आरक्षणाचे समीकरण नेहमीच निर्णायक राहिले आहे:
पहिले महापौर :
स्मिता खानापुरे (काँग्रेस : सर्वसाधारण महिला, कार्यकाळ : २१ मे २०१२ ते २०१४)
दुसरे महापौर :
अख्तर मिस्तरी (काँग्रेस : ओबीसी पुरुष, कार्यकाळः २०१४ ते १३ मे २०१६)
तिसरे महापौर :
दीपक सूळ (काँग्रेस : ओबीसी प्रवर्ग, कार्यकाळः १३ मे २०१६ ते २१ मे २०१७)
चौथे महापौर :
सुरेश पवार (भाजप : खुला प्रवर्ग, कार्यकाळ : २१ मे २०१७ ते २१ नोव्हेंबर २०१९)
पाचवे महापौर :
विक्रांत गोजमगुंडे (काँग्रेस : ओबीसी पुरुष, कार्यकाळः २२ नोव्हेंबर २०१९ ते २१ मे २०२२)