लातूरात 'ट्विस्ट'! भाजप बंडखोरांची 'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी' स्थापन, शिंदेसेना-घड्याळाला साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:00 IST2026-01-05T16:59:45+5:302026-01-05T17:00:02+5:30
'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी'चे २८ उमेदवार रिंगणात राहणार आहेत

लातूरात 'ट्विस्ट'! भाजप बंडखोरांची 'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी' स्थापन, शिंदेसेना-घड्याळाला साथ
लातूर : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात मोठी खदखद कायम आहे. उमेदवारी वाटपात डावलल्या गेल्याचा आरोप करत पक्षातील जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. नितीन शेटे यांच्या नेतृत्वाखाली 'निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी' स्थापन करण्यात आली असून, या आघाडीचे २८ उमेदवार रिंगणात राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही आघाडी आता महायुतीतील इतर घटक पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भाजपमधील काही नाराजांनी माघार घेण्यास नकार दिला. माध्यमांशी बोलताना नितीन शेटे यांनी स्थानिक भाजप नेतृत्वावर बोचरी टीका केली. स्थानिक नेतृत्वाने तीन मोठ्या चुका केल्या असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, 'निष्ठावंतांची' ताकद मैदानात किती दिसते आणि भाजप आपली ही गळती रोखण्यात यशस्वी होतो का, याकडे संपूर्ण लातूरकरांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक नेतृत्वाच्या या तीन चुका; शेटे यांचा आरोप..!
युती न करणे: शिंदेसेना आणि राष्ट्रवादी(अजित पवार) यांच्यासोबत अधिकृत युती न करून मित्रपक्षांना दुखावले.
बाहेरच्यांना संधी : वर्षानुवर्षे पक्षासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या निष्ठावंतांना डावलून 'आयाराम-गयारामांना' उमेदवारीची खिरापत वाटली.
कार्यकर्त्यांची उपेक्षा : जुन्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा विचार न करता नवीन चेहऱ्यांवर अवाजवी विश्वास टाकला.
आमची लढाई तत्त्वांसाठी
"स्थानिक भाजप नेतृत्वाने केलेल्या चुका सुधारण्यासाठी आम्ही ही आघाडी उभी केली आहे. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले, त्यांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली गेली. आता आमची लढाई ही तत्त्वांसाठी आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांशी आमची बोलणी सुरू असून, आम्ही एकमेकांना पूरक मदत करून ही निवडणूक लढवू."
- नितीन शेटे, निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी.
महायुतीच्या समीकरणात नवा ट्विस्ट !
जिथे शिंदेसेनेचे उमेदवार नाहीत, तिथे 'निष्ठावंत आघाडी'ला सहकार्य मिळेल आणि जिथे आघाडीचे उमेदवार नाहीत, तिथे शिंदेसेना व राष्ट्रवादीला मदत केली जाईल, असे निष्ठावंत कार्यकर्ता आघाडीचे समीकरण आहे. या नवीन समीकरणामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता शनिवारी (३ जानेवारी) उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटेल.
महत्त्वाचे मुद्दे :
२८ उमेदवार : निष्ठावंत आघाडीने शहराच्या विविध प्रभागांत आपले उमेदवार कायम ठेवले आहेत.
महायुतीतील मित्रपक्षांशी समझोता : अधिकृत भाजपला शह देण्यासाठी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासोबत उघड युतीचे संकेत.
बंडखोरीचे सावट : भाजपच्या हक्काच्या मतांमध्ये ही आघाडी फूट पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.